Chiplun Pisori Deer Rescue: मार्गताम्हाणे येथील विहिरीत पडलेल्या दुर्मिळ पिसोरी हरणाची सुटका; वन विभागाच्या पथकाची यशस्वी कामगिरी

Chiplun Pisori Deer Rescue: मार्गताम्हाणे येथील विहिरीत पडलेल्या दुर्मिळ पिसोरी हरणाची सुटका; वन विभागाच्या पथकाची यशस्वी कामगिरी

वैद्यकीय तपासणीनंतर हरणाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात मुक्त केले

Chiplun Pisori Deer Rescue बाबत मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण येथील मौजे मार्गताम्हाणे खुर्द पैकी सुतारवाडी येथे विहिरीत पडलेल्या एका दुर्मिळ पिसोरी हरणाची वन विभागाच्या बचाव पथकाने यशस्वीरीत्या सुटका केली आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली.

सुतारवाडी येथील रहिवासी प्रताप सुर्वे यांच्या आंबा-काजू बागेतील विहिरीमध्ये एक वन्यप्राणी पडल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने याची माहिती चिपळूणचे वनपाल एस. एस. सावंत यांना दिली. माहिती मिळताच वन विभागाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

Chiplun Pisori Deer Rescue: बचाव पथकाची धडाडीची कामगिरी
या बचाव पथकामध्ये वनपाल एस. एस. सावंत यांच्यासह वनरक्षक राहुल गुंठे, कृष्णा इरमले आणि आरआरटी (RRT) टीमचे सदस्य अथर्व घाग यांचा समावेश होता. विहिरीत पडलेलाप्राणी हा ससा नसून एक अत्यंत दुर्मिळ पिसोरी हरण असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

Shanti real estate 1

पिसोरी हरणाला सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी पथकाने तातडीने प्रयत्न सुरू केले. हरणाने विहिरीत उडी मारून पोहण्यास सुरुवात केली होती, तरीही बचाव पथकाने जाळीच्या साहाय्याने अत्यंत काळजीपूर्वक त्याला सुरक्षितपणे बाहेर काढले.

प्राण्याची वैद्यकीय आणि शारीरिक तपासणी केल्यानंतर ते पूर्णपणे सुस्थितीत असल्याची खात्री करण्यात आली. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली त्यास त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले. विभागीय वन अधिकारी श्रीमती गिरिजा देसाई, सहाय्यक वनसंरक्षक श्रीमती प्रियंका लगड आणि वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांचे या मोहिमेस मार्गदर्शन लाभले. वन विभागाच्या या तत्पर व यशस्वी कारवाईमुळे एका दुर्मिळ वन्यप्राण्याचा जीव वाचला आहे.