शशिकांत वारीशे खून प्रकरण : मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकरचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला; रत्नागिरी सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय!

शशिकांत वारीशे खून प्रकरण : मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकरचा जामीन अर्ज पुन्हा फेटाळला; रत्नागिरी सत्र न्यायालयाचा मोठा निर्णय!

आजारपण आणि साक्षीदार फितूर झाल्याचा दावा ठरला निष्फळ; पोलीस बंदोबस्तात खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची न्यायालयाची मुभा

रत्नागिरी : महाराष्ट्रभरात खळबळ माजवून देणाऱ्या पत्रकार शशिकांत वारीशे खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याचा जामिनासाठीचा प्रयत्न पुन्हा एकदा अपयशी ठरला आहे. विविध आजारांचे कारण आणि साक्षीदार फितूर झाल्याचा दावा पुढे करत आंबेरकरने दाखल केलेला जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाने स्पष्ट शब्दांत फेटाळून लावला आहे. त्यामुळे आंबेरकरला तुर्तास तुरुंगातच राहावे लागणार आहे.

आजारपणाची मोठी जंत्री न्यायालयासमोर सादर :

जामीन मिळवण्यासाठी पंढरीनाथ आंबेरकरने आपल्या गंभीर आजारपणाचे कारण पुढे केले होते. आपल्याला मधुमेह, उच्च रक्तदाब (बीपी), अँजिओप्लास्टी, मूळव्याध तसेच मूत्रपिंडाचा (किडनी) विकार असल्याची मोठी जंत्रीच त्याने न्यायालयासमोर मांडली होती. रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात या आजारांवर उपचारासाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नाहीत, त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी तसेच गंभीर मानसिक तणावाखाली असल्याने मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार मिळण्यासाठी जामीन मंजूर करावा, अशी विनवणी आंबेरकरच्या वतीने न्यायालयात करण्यात आली.

Arihant 4

साक्षीदार फितूर झाल्याची पळवाटही ठरली निष्फळ :

केवळ आजारपणच नव्हे, तर खटल्यातील २८ साक्षीदारांपैकी मुख्य प्रत्यक्षदर्शी आणि इतर काही साक्षीदार फितूर (प्रतिकूल) झाले असल्याचा दावाही आरोपीने केला. साक्षीदार फितूर झाल्याने आपल्याविरुद्धचा पुरावा कमकुवत झाला आहे, असा युक्तिवाद करत त्याने जामिनासाठी पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला.

न्यायालयाचे स्पष्ट निर्देश :

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आंबेरकरचे सर्व दावे फेटाळून लावले. आरोपीला पोलीस बंदोबस्तात खासगी रुग्णालयात आवश्यक ते सर्व वैद्यकीय उपचार घेण्याची पूर्ण मुभा आधीच देण्यात आली आहे. त्यामुळे वैद्यकीय उपचारांच्या आधारावर त्याला प्रत्यक्ष जामीन मंजूर करण्यासाठी कोणतेही सबळ आणि ठोस कारण दिसून येत नाही, असे स्पष्ट करत न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला.