कोकणकन्या एक्स्प्रेसचा ‘सुपरफास्ट’ दर्जा रद्द करा; कोकण विकास समितीचे रेल्वे बोर्डाला साकडे!

कोकणकन्या एक्स्प्रेसचा ‘सुपरफास्ट’ दर्जा रद्द करा; कोकण विकास समितीचे रेल्वे बोर्डाला साकडे!

वेळापत्रकातील बदलामुळे मांडवी एक्स्प्रेसला सातत्याने विलंब; दोन्ही गाड्यांच्या देखभालीवर ताण आल्याने प्रवासी हैराण

*खेड : *कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या ‘मांडवी एक्स्प्रेस’ला वारंवार होणाऱ्या विलंबामागे ‘कोकणकन्या एक्स्प्रेस’च्या वेळापत्रकातील बदल कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे कोकणकन्या एक्स्प्रेसचा ‘सुपरफास्ट’ दर्जा रद्द करून तिचा जुना गाडी क्रमांक व पूर्वीची वेळ पूर्ववत लागू करावी, अशा मागणीचे निवेदन कोकण विकास समितीच्या वतीने रेल्वे बोर्डाला सादर करण्यात आले आहे.

जानेवारी २०२३ मधील बदलाचा फटका :

जानेवारी २०२३ मध्ये कोकणकन्या एक्स्प्रेसला सुपरफास्ट दर्जा देण्यात आला. त्यावेळी ही गाडी मडगावहून सुटण्याची वेळ सायंकाळी ६ ऐवजी ७ वाजता करण्यात आली. या एका तासाच्या बदलामुळे दोन्ही गाड्यांच्या रेक जोडणी (Rake Sharing) आणि देखभाल व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला आहे.

SONA HERBAL

मांडवी एक्स्प्रेसवर थेट परिणाम; चाकरमान्यांचे हाल :

कोकणकन्या एक्स्प्रेसला होणाऱ्या विलंबाचा थेट फटका दुसऱ्या दिवशी सकाळी धावणाऱ्या मांडवी एक्स्प्रेसच्या वेळापत्रकाला बसत आहे. माणगाव, संगमेश्वर, आडवली, राजापूर आणि वैभववाडी यांसारख्या स्थानकांमधील प्रवाशांसाठी मांडवी एक्स्प्रेस ही जीवनवाहिनी मानली जाते. मात्र, ही गाडी सातत्याने उशिरा धावत असल्याने नोकरी, व्यवसाय, मुंबईत उपचारासाठी जाणारे रुग्ण आणि पुढील प्रवासाचे नियोजन करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

कोकण विकास समितीच्या प्रमुख मागण्या :

कोकणकन्या एक्स्प्रेसचा ‘सुपरफास्ट’ दर्जा तातडीने रद्द करण्यात यावा.

या गाडीचा जुना १०१११/१०११२ हा क्रमांक पूर्ववत करून मडगावहून ती सायंकाळी ६ वाजताच सोडण्यात यावी.

मांडवी एक्स्प्रेसची पूर्वीप्रमाणे रेक देखभाल व्यवस्था पूर्ववत करावी, जेणेकरून दोन्ही गाड्यांचे वेळापत्रक आणि नियमितता सुरळीत राहील.