Nayari Elder Murder Case: नायरी येथील ९१ वर्षीय वृद्ध सासूची हत्या करणाऱ्या फरार सुनेला पोलिसांकडून अटक; लपून बसलेल्या संशयितावर धडक कारवाई

Nayari Elder Murder Case: नायरी येथील ९१ वर्षीय वृद्ध सासूची हत्या करणाऱ्या फरार सुनेला पोलिसांकडून अटक; लपून बसलेल्या संशयितावर धडक कारवाई

वृद्ध सासूची देखभाल करावी लागत असल्याच्या कारणावरून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करणाऱ्या सुनेला संगमेश्वर पोलिसांकडून बेड्या

Nayari Elder Murder Case: रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील नायरी येथील ९१ वर्षीय वृद्ध महिला जुलेखा इसाक मोडक यांच्या मृत्यू प्रकरणास आता मोठे वळण मिळाले आहे. वृद्ध सासूला लाकडी दांडक्याने आणि हाताबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा गंभीर आरोप असलेल्या सुनेला संगमेश्वर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. घटनेनंतर मागील काही दिवसांपासून पोलिसांना चकवा देत लपून बसलेल्या संशयित महिलेला पोलिसांनी अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे.

प्राप्त माहितीनुसार, २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ ते ५:३० च्या सुमारास नायरी येथील राहत्या घरी ९१ वर्षीय जुलेखा इसाक मोडक यांना मारहाण करण्यात आली होती. वृद्ध महिलेची देखभाल करावी लागत असल्याच्या तसेच देखभाल करताना इतरत्र कुठेही फिरायला जाता येत नसल्याच्या किरकोळ कारणावरून त्यांची सून नाशिरा अस्लम मोडक हिने संतापून त्यांच्यावर लाकडी दांडक्याने आणि हाताबुक्क्यांनी हल्ला चढवला होता.

या अमानुष मारहाणीत वृद्धेच्या उजव्या गुडघ्याला, डाव्या पायाला तसेच उजव्या मनगटाला गंभीर दुखापत झाली होती. याप्रकरणी पीडितेची मुलगी जैबुनिसा निजामुद्दीन लांबे (वय ६०, रा. नेरूळ, नवी मुंबई) यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती, ज्यानुसार सुनेविरोधात सुरुवातीला गुन्हा नोंदवण्यात आला होता. दरम्यान, गंभीर जखमी झालेल्या जुलेखा मोडक यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, ज्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले.

Arihant 1

वृद्ध सासूची हत्या आणि मारहाणीच्या गंभीर गुन्ह्यानंतर संशयित सून नाशिरा मोडक ही फरार झाली होती आणि सतत पोलिसांना चकवा देत होती. मात्र, पोलीस तिच्या मागावरच होते. नायरी येथील तिच्या घराची पाहणी केली असता, समोरच्या दरवाजाला कडी आणि मागच्या बाजूने कुलूप लावलेले दिसून आले.

संशयित महिला त्याच बंद घरात असल्याच्या पक्क्या संशयावरून बुधवारी पहाटेपासूनच संगमेश्वर पोलीस ठाण्याच्या पथकाने सूत्रे हलवली. हेड कॉन्स्टेबल विनय मनवल यांनी या परिसरावर बारीक नजर ठेवली. अखेर सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हेड कॉन्स्टेबल विनय मनवल, हेड कॉन्स्टेबल क्रांती सावंत आणि पोलीस हवालदार भोसले यांनी धडक कारवाई करत संशयित नाशिरा मोडक हिला ताब्यात घेतले.

जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मितेश किणी या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. ९१ वर्षांच्या वृद्धेच्या मारहाणीच्या तक्रारीपासून सुरू झालेला हा प्रवास आता हत्येचा गुन्हा आणि सुनेच्या अटकेपर्यंत येऊन ठेपला आहे. वृद्धेच्या मृत्यूचे नेमके वैद्यकीय कारण, मारहाणीचा मृत्यूशी असलेला संबंध आणि त्यामागील इतर तांत्रिक बाजूंचा पोलीस सखोल शोध घेत आहेत.