Aare Ware Beach Safety: आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ४ होमगार्डस् आणि रोबोटिक वॉटरक्राफ्ट तैनात

Aare Ware Beach Safety: आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी ४ होमगार्डस् आणि रोबोटिक वॉटरक्राफ्ट तैनात

गणपतीपुळे मार्गावरील धोकादायक आरे-वारे किनाऱ्यावर बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत; होमगार्डस्ना दिले क्राफ्ट चालवण्याचे विशेष प्रशिक्षण

Aare Ware Beach Safety: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ गणपतीपुळेकडे जाणाऱ्या मार्गावरील आणि पर्यटकांची सर्वाधिक गर्दी होणाऱ्या आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर पोलिस प्रशासनाकडून सुरक्षेसाठी ४ होमगार्डस् नेमण्यात आले आहेत. दिवाळी सुट्टीच्या कालावधीत होणारी पर्यटकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन, समुद्रात बुडणाऱ्या पर्यटकांना तात्काळ वाचवण्यासाठी प्रशासनाकडून आधुनिक ‘रोबोटिक वॉटरक्राफ्ट’ची मदत घेतली जाणार असून, हे क्राफ्ट चालवण्याचे विशेष प्रशिक्षण संबंधित होमगार्डस्ना देण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील विस्तीर्ण आणि निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटनाचा आनंद घेताना होणाऱ्या दुर्दैवी दुर्घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून जिल्ह्यासाठी एकूण ५ अत्याधुनिक रोबोटिक वॉटरक्राफ्ट खरेदी करण्यात आले आहेत. गणपतीपुळे आणि गुहागर समुद्रकिनाऱ्यांपाठोपाठ पोहण्यासाठी अत्यंत धोकादायक ठरलेल्या आरे-वारे किनाऱ्यावरही हे रोबोटिक वॉटरक्राफ्ट कार्यान्वित करण्यात आले आहे.

आरे-वारे समुद्रकिनाऱ्यावर दरवर्षी देशभरातून लाखो पर्यटक भेट देण्यासाठी येत असतात. मात्र, या ठिकाणी समुद्र आणि खाडी एकत्र येत असल्यामुळे पाण्याच्या खोलीचा आणि परिस्थितीचा अंदाज न आल्याने किंवा पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे अनेक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, आतापर्यंत आरे-वारे पुलाजवळ २५ हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

Mobile hub

वाढत्या दुर्घटनांची ही गंभीर बाब लक्षात घेऊन, भविष्यातील अमूल्य मानवी जीव वाचवण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीचे बचावकार्य करता यावे, या मुख्य उद्देशाने बचाव यंत्रणेत रोबोटिक वॉटरक्राफ्ट्सचा समावेश करण्यात आला आहे.

"रोबोटसारख्या आधुनिक यंत्रणेमुळे पर्यटकांच्या सुरक्षेत मोठी मदत होणार असली तरी पर्यटकांनी स्वतःची काळजी घेऊनच पाण्याच्या प्रवाहात उतरले पाहिजे."
– आदेश कदम, पोलिसपाटील, आरे-वारे