Ratnagiri Paratvane Death: परटवणे सरोदेवाडी येथे बंद घरात ४३ वर्षीय व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ; शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

Ratnagiri Paratvane Death: परटवणे सरोदेवाडी येथे बंद घरात ४३ वर्षीय व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ; शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

पोलिसांकडून तपास सुरू

Ratnagiri Paratvane Death: रत्नागिरी तालुक्यातील परटवणे सरोदेवाडी, साई मंदिर परिसरातील एका बंद घरात एका ४३ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद आणि कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. रामदास मोहन पाटील (वय ४३, रा. परटवणे सरोदेवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव असून, याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, परटवणे येथील स्थानिक रहिवासी शिवगण यांनी एका व्यक्तीला फोन करून रामदास यांच्या घराचा दरवाजा बंद असून घरातून तीव्र दुर्गंधी येत असल्याची माहिती दिली. तसेच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने परटवणे येथे येण्यास सांगितले. ही माहिती मिळताच संबंधित व्यक्तीने रामदास पाटील यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा फोन बंद येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी तातडीने परटवणे सरोदेवाडी येथील घर गाठले.

घराबाहेर जाऊन रामदास यांना वारंवार हाका मारूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दरवाजा उघडून आत डोकावून पाहिले असता, रामदास पाटील हे बेडरूममध्ये उताण्या अवस्थेत निपचित पडलेले दिसून आले. अनेक दिवसांपासून बंद असलेल्या घरात त्यांचा मृतदेह पूर्णपणे फुगलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच हलकल्लोळ उडाला.

Syramic tiles

घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ रत्नागिरी शहर पोलिसांना याबाबत पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि रामदास पाटील यांना उपचारासाठी तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सखोल तपासणीअंती रामदास यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

या घटनेची नोंद ९ नोव्हेंबर २०२६ रोजी संध्याकाळी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. रामदास पाटील यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसून, ते शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील सखोल तपास रत्नागिरी शहर पोलीस करत आहेत.