स्वप्नाली सावंत हत्या प्रकरण: मुख्य आरोपी पती सुकांत सावंत आणि नोकराचा जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाकडून फेटाळला

स्वप्नाली सावंत हत्या प्रकरण: मुख्य आरोपी पती सुकांत सावंत आणि नोकराचा जामीन अर्ज रत्नागिरी सत्र न्यायालयाकडून फेटाळला

खटल्याला होत असलेला विलंब आणि चार वर्षांहून अधिक काळ कारावास भोगूनही आरोपींना दिलासा नाही; गुन्हेगारी इतिहास आणि डीएनए अहवाल ठरला महत्त्वाचा

Swapnali Sawant Murder Case: पत्नी स्वप्नाली सावंत हिच्या बहुचर्चित हत्या प्रकरणात मुख्य आरोपी पती सुकांत गजानन सावंत आणि त्याचा कथित साथीदार तथा नोकर संशयित आरोपी प्रमोद ऊर्फ पम्या बाबू रावणंग यांना दिलासा देण्यास रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायालयाने स्पष्ट नकार दिला आहे. दोन्ही आरोपींनी दाखल केलेले सलग जामीन अर्ज ७ नोव्हेंबर २०२६ रोजी न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. संशयित आरोपींना चार वर्षांहून अधिक काळ कारागृहात काढावा लागला असून खटल्यातील तब्बल ४१ साक्षीदारांची तपासणी अद्याप बाकी असल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद होता. मात्र, असे असूनही न्यायालयाने पतीचा गंभीर गुन्हेगारी इतिहास, त्याच्याविरुद्ध प्रलंबित असलेले अन्य गुन्हे आणि नोकराच्या प्रकरणात हाडांचे अवशेष, राख व डीएनए अहवालातून मिळालेली पुष्टी या बाबी ग्राह्य धरत दोन्ही अर्ज नामंजूर केले आहेत.

अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. आंबळकर यांनी सत्र खटला क्रमांक ११/२०२३ मधील अर्ज क्रमांक २०५ आणि २१० वर स्वतंत्र आदेश देत हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३४९/२०२२ अन्वये भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२, २०१ आणि १२०-ब नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अभियोजन पक्षाच्या कथनानुसार, मृत स्वप्नाली सावंत आणि आरोपी सुकांत सावंत यांचा विवाह सुमारे १९ वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, मागील काही वर्षांपासून दोघांमध्ये वाद सुरू असल्यामुळे ते स्वतंत्र राहत होते. स्वप्नाली आपले स्वतःचे ब्युटी पार्लर आणि कापडाचे दुकान चालवत होती. त्यांना साहिल हा मुलगा आणि सलोनी ही मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. पती आपल्या चारित्र्यावर संशय घेत असून सतत जीवे मारण्याच्या धमक्या देत असल्याचे स्वप्नालीने आपल्या आईला सांगितले होते. तसेच मागील वर्षी पतीने पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोपही तिने केला होता, त्यातून बचावल्यावर तिने पतीविरोधात तक्रार दाखल केली होती.

३१ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी स्वप्नालीने आपल्या आईला फोन करून आपण मुलीसह पतीच्या घरी असल्याचे आणि गणपती उत्सवासाठी दुसऱ्या दिवशी येणार असल्याचे कळवले होते. मात्र, ठरल्याप्रमाणे ती १ सप्टेंबर रोजी घरी पोहोचली नाही आणि तिचा मोबाईल बंद असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली. त्यानंतर २ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे, त्याचवेळी पती सुकांत यानेही ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. परंतु, तिच्या नातेवाइकांनी पती सुकांत आणि त्याचा नोकर प्रमोद यांच्यावर तीव्र संशय व्यक्त केला होता.

Shanti2

१० सप्टेंबर रोजी स्वप्नालीची आई आणि नातेवाईक सुकांतच्या घरी गेले असता त्यांच्यात वाद झाला. यावेळी सुकांतने पत्नीने आपली प्रतिष्ठा मलीन केली आणि खोटी तक्रार दाखल केल्याचे सांगितल्याचा आरोप आहे. तसेच आपण आणि अन्य आरोपींनी मिळून तिचा गळा आवळून खून केला, मृतदेह जाळला आणि राख समुद्रात फेकून दिली, असे त्याने सांगितल्याचा दावा तक्रारदार महिलेने केला होता. या कथित कबुलीच्या आधारे पुढे गुन्हा दाखल करण्यात आला.

बचाव पक्षाने या प्रकरणी खटल्याच्या संथ गतीचा मुद्दा अत्यंत प्रकर्षाने मांडला होता. पती सुकांत याने यापूर्वी उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. १५ सप्टेंबर २०२५ रोजीच्या आदेशात तो तीन वर्षांहून अधिक काळ कारागृहात असल्याची आणि अभियोजन पक्षाच्या एकूण ५९ साक्षीदारांपैकी केवळ १६ साक्षीदार तपासल्याची नोंद झाली होती. त्यावेळी सहा महिन्यांत खटला पूर्ण न झाल्यास पुन्हा अर्ज करण्याच्या मुभेसह त्याने जामीन अर्ज मागे घेतला होता. मात्र, वर्षभरानंतरही खटला पूर्ण झालेला नाही आणि अभियोजन पक्षाला केवळ १८ साक्षीदार तपासता आले असून अजूनही ४१ साक्षीदारांची तपासणी बाकी आहे. आरोपीने कोणतीही अनावश्यक तहकुबी मागितली नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला होता.

पती सुकांतच्या जामीन अर्जाला तीव्र विरोध करताना तपास यंत्रणेने त्याच्याविरुद्ध रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तब्बल दहा गुन्ह्यांचा तपशील न्यायालयासमोर मांडला. यात २००६ मधील दरोड्याचा गुन्हा, २०११ मधील घरात घुसून विनयभंगाचा आरोप, २०१५ मधील आग लावणे आणि घरफोडीचे गुन्हे, तसेच २०२० मधील खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आणि घरात घुसण्याच्या आरोपांशी संबंधित गुन्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, मृत स्वप्नालीने यापूर्वीच पतीविरोधात कलम ३०७ अन्वये खुनाच्या प्रयत्नाची तक्रार केल्याचे सरकारी अभियोक्त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. अर्जदाराचा गुन्हेगारी इतिहास अत्यंत गंभीर असून बाहेर आल्यास तो उर्वरित साक्षीदारांवर दबाव आणू शकतो, या युक्तिवादावर न्यायालयाने सुकांतचा जामीन फेटाळला.

दुसऱ्या बाजूला, नोकर असलेला आरोपी प्रमोद ऊर्फ पम्या रावणंग यानेही नियमित जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याच्या वतीने तो कुटुंबातील एकमेव कमावता सदस्य असल्याचा युक्तिवाद झाला. मात्र, तपास अधिकाऱ्यांनी त्याच्या अर्जाला विरोध करताना स्पष्ट केले की, सध्याच्या अर्जदाराने दिलेल्या माहितीच्या आधारेच काही हाडांचे अवशेष आणि राख जप्त करण्यात आली असून डीएनए अहवालातूनही अभियोजन पक्षाच्या सिद्धांताला पुष्टी मिळत आहे. या पुराव्यांच्या आधारावर न्यायालयाने प्रमोदचाही जामीन अर्ज फेटाळला आहे.