Rajapur Liquor Seizure: राजापूरमध्ये अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या युवकावर पोलिसांची मोठी कारवाई; दुचाकीसह ८३,०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

Rajapur Liquor Seizure: राजापूरमध्ये अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या युवकावर पोलिसांची मोठी कारवाई; दुचाकीसह ८३,०२० रुपयांचा मुद्देमाल जप्त

गुजराळी दातार छापखाना ते साखळकरवाडी मार्गावर गस्तीदरम्यान पोलिसांनी सापळा रचून तरुणाला घेतले ताब्यात; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Rajapur Liquor Seizure: रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर शहरातील गुजराळी दातार छापखाना ते साखळकरवाडी जाणाऱ्या मार्गावर राजापूर पोलिसांनी ९ नोव्हेंबर रोजी सव्वाअकरा वाजताच्या सुमारास धडक कारवाई केली आहे. बिगरपरवाना आणि बेकायदेशीररीत्या गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणाऱ्या एका युवकाला पोलिसांनी रंगेहात पकडले असून, त्याच्याकडून दारूचा साठा, दुचाकी आणि दोन मोबाईल असा एकूण ८३,०२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल प्रथमेश प्रकाश वारीक (वय ३२) हे आपल्या सहकाऱ्यांसह परिसरात नियमित गस्त घालत होते. यावेळी साखळकरवाडी रस्त्यावर त्यांना एका दुचाकीस्वाराच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. पोलिसांनी तत्परता दाखवत रोहित शिवाजी खानविलकर (वय २६, रा. खडपेवाडी, राजापूर) याला अडवून त्याच्या टीव्हीएस ज्युपिटर दुचाकीची झडती घेतली. तपासणीदरम्यान दुचाकीमध्ये लपवून ठेवलेला गोवा बनावटीचा अवैध दारूसाठा पोलिसांच्या हाती लागला.

या कारवाईमध्ये पोलिसांनी विविध वस्तू आणि मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ५०,००० रुपये किमतीची आकाशी रंगाची टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी (क्रमांक: MH-08-BH-4768), ७,२०० रुपये किमतीचे हेवर्ड्स फाईन व्हिस्की या गोवा बनावटीच्या दारूचे ५ बॉक्स (१८० मिलीच्या २४० बाटल्या), तसेच ७,८२० रुपये किमतीचे मॅकडोवेल्स नं. १ दारूचे २ बॉक्स (१८० मिलीच्या ९२ बाटल्या) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त आरोपीकडून ८,००० रुपये किमतीचा ओप्पो आणि १०,००० रुपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा असे दोन वापरते मोबाईल फोन देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

Shoping fiesta

या संपूर्ण प्रकरणी आरोपी रोहित खानविलकर याच्याविरोधात राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९७/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) आणि (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा अवैध दारूचा साठा कोठून आणला गेला आणि तो कोठे पोहोचवला जाणार होता, याचा सखोल तपास राजापूर पोलीस करत आहेत.