प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यासाठी कोकण रेल्वे प्रशासनाला ८ दिवसांची मुदत; कार्यवाही न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा
Ratnagiri Station Parking Issue: रत्नागिरी रेल्वे स्थानकाबाहेरील ‘पे अँड पार्किंग’ ठेकेदाराकडून सर्वसामान्य प्रवासी आणि ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा गंभीर आरोप करत युवासेनेने कोकण रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले आहे. या पार्श्वभूमीवर पुढील ८ दिवसांत स्थानकावर प्रवाशांना सोडण्यासाठी येणाऱ्या वाहनांसाठी मोफत पार्किंगची सुविधा तात्काळ सुरू करावी, अशी ठाम मागणी युवासेनेचे माजी रत्नागिरी जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी कोकण रेल्वे प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे.
युवासेनेचे माजी जिल्हा युवाधिकारी प्रसाद सुरेश सावंत यांनी कोकण रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना हे निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद केल्यानुसार, पूर्वी स्थानक परिसरात आजारी आणि वृद्ध प्रवाशांना सोडण्यासाठी वाहने दोन मिनिटे थांबवण्याची मुभा दिली जात होती. मात्र, आता स्थानकाच्या आतील रस्त्यावर डिव्हायडर टाकून ती सोयही बंद करण्यात आली आहे. परिणामी, प्रवाशांना सोडण्यासाठी अवघ्या दोन मिनिटांसाठी आलेल्या नागरिकांकडूनही सक्तीने पूर्ण पार्किंग शुल्क वसूल केले जात आहे.
पार्किंगचे पैसे न भरल्यास नागरिकांना आपली वाहने मुख्य रस्त्यावर लांब उभी करावी लागत आहेत. या गैरसोयीचा सर्वाधिक मनस्ताप आणि त्रास वयोवृद्ध माता-पित्यांना तसेच आजारी प्रवाशांना सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाने स्थानकावर प्रवाशांसाठी कोणतीही मोफत पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे ही व्यवस्था प्रवाशांच्या सोयीसाठी आहे की केवळ सर्वसामान्य जनतेच्या खिशातून पैसे काढण्यासाठी, असा संतप्त सवाल रत्नागिरीकर नागरिक विचारत असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

युवासेनेच्या कोकण रेल्वे प्रशासनाकडे प्रमुख मागण्या:
प्रवाशांना स्थानकावर सोडण्यासाठी १० मिनिटांचा मोफत ‘ड्रॉप अँड गो’ (Drop and Go) झोन तात्काळ सुरू करण्यात यावा.
पे अँड पार्किंग ठेकेदाराची मनमानी शुल्क वसुली आणि प्रवाशांशी होणारी दादागिरी त्वरित थांबवण्यात यावी.
पार्किंगचे अधिकृत दरफलक दर्शनी भागात लावून प्रत्येक वाहनचालकास अधिकृत पावती देणे बंधनकारक करावे.
वयोवृद्ध, दिव्यांग तसेच महिला प्रवाशांच्या सोयीसाठी स्वतंत्र आणि सुरक्षित व्यवस्था उपलब्ध करून द्यावी.
पुढील ८ दिवसांच्या आत रेल्वे प्रशासनाने या मागण्यांवर ठोस कार्यवाही करून प्रवाशांना दिलासा न दिल्यास, शिवसेना आणि युवासेना स्टाईलने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्रसाद सावंत यांनी कोकण रेल्वे प्रशासनाला दिला आहे.













