‘श्री महालक्ष्मी मिनी मॉल’ आगीचं तातडीनं सर्वेक्षण करण्याचे ना. उदय सामंत यांचे विमा कंपन्यांना निर्देश!

‘श्री महालक्ष्मी मिनी मॉल’ आगीचं तातडीनं सर्वेक्षण करण्याचे ना. उदय सामंत यांचे विमा कंपन्यांना निर्देश!

पालकमंत्र्यांकडून घटनास्थळाची पाहणी; येत्या ३ ते ४ दिवसांत मॉल पुन्हा सुरू करण्याचा मानस, शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील के. सी. जैन नगर, मारुती मंदिर परिसरातील प्रसिद्ध ‘श्री महालक्ष्मी मिनी मॉल’ला ऐन भाऊबीजेच्या पहाटे लागलेल्या भीषण आगीत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आज राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीची पाहणी केली आणि नुकसानग्रस्त व्यावसायिकांशी संवाद साधून त्यांना धीर दिला. विमा कंपन्यांनी आजच नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत.

पालकमंत्र्यांची घटनास्थळी भेट अन् व्यापाऱ्यांना धीर :

दुर्घटनेची पाहणी केल्यानंतर बोलताना ना. उदय सामंत म्हणाले की, सणासुदीच्या काळात वर्षानुवर्षांच्या कष्टातून उभा केलेला व्यवसाय आगीच्या भक्ष्यस्थानी पडणे ही अत्यंत वेदनादायी बाब आहे. या संकटातून नुकसानग्रस्त दुकानदारांना पुन्हा ताकदीने उभे करणे ही माझीदेखील जबाबदारी आहे. आगीमुळे दुकानांचे नुकसान झाले असले, तरी व्यापाऱ्यांची जिद्द आणि पुन्हा उभे राहण्याचा विश्वास कमी होता कामा नये. या कठीण प्रसंगी प्रशासन आणि मी स्वतः व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.

Law firm

विमा कंपन्यांना आजच सर्वेक्षणाचे निर्देश :

नुकसानग्रस्त व्यावसायिकांना विम्याच्या माध्यमातून लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी, यासाठी संबंधित विमा कंपन्यांना आजच नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. यासोबतच आगीची झळ बसलेल्या मॉल लगतच्या आणखी एका दुकानाचेही स्वतंत्र सर्वेक्षण करण्यास सांगण्यात आले आहे.

३ ते ४ दिवसांत मॉल पुन्हा सुरू करण्याचा मानस :

दुर्घटनेची माहिती मिळाल्यापासून आगीवर पूर्ण नियंत्रण मिळेपर्यंत आपण स्वतः व्हिडिओ कॉलद्वारे संबंधित यंत्रणांच्या सतत संपर्कात होतो. अग्निशमन दलाने ४ ते ५ तास अथक परिश्रम करत १० ते १५ बंबांच्या सहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले आणि सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे सामंत यांनी नमूद केले. तसेच, आवश्यक उपाययोजना करून येत्या ३ ते ४ दिवसांत श्री महालक्ष्मी मिनी मॉल पुन्हा नागरिकांच्या सेवेत सुरू करण्याचा मानस असून त्यादृष्टीने कार्यवाहीला गती देण्यात आली आहे.

शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज; अग्निसुरक्षेच्या सूचना :

प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सर्व व्यावसायिक आस्थापनांमध्ये आवश्यक अग्निसुरक्षा आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सक्त सूचनाही पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.