रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात एस.व्ही.एम. क्रिकेट अकॅडमीचा डंका! प्रतिष्ठित ‘अंडर-१४ इन्व्हिटेशन’ स्पर्धेसाठी ६ खेळाडूंची निवड

रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात एस.व्ही.एम. क्रिकेट अकॅडमीचा डंका! प्रतिष्ठित ‘अंडर-१४ इन्व्हिटेशन’ स्पर्धेसाठी ६ खेळाडूंची निवड

रत्नागिरी जिल्हा, पुणे आणि ‘वेस्ट झोन’ संघात रत्नागिरीच्या बालखेळाडूंची चमक; सर्वच स्तरांतून कौतुकाचा वर्षाव

*रत्नागिरी : *रत्नागिरीतील एस.व्ही.एम. (सर्वंकष विद्यामंदिर) क्रिकेट अकॅडमीच्या खेळाडूंनी आपल्या सातत्यपूर्ण आणि चमकदार कामगिरीच्या जोरावर पुन्हा एकदा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. या अकॅडमीच्या तब्बल ६ प्रतिभावान खेळाडूंची प्रतिष्ठित ‘अंडर-१४ इन्व्हिटेशन’ (१४ वर्षांखालील निमंत्रित) क्रिकेट स्पर्धेसाठी विविध नामांकित संघांत निवड झाली आहे. या घवघवीत यशामुळे अकॅडमीसह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून या बालखेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

रत्नागिरी जिल्हा संघाकडून तीन खेळाडूंची निवड :

या निमंत्रित स्पर्धेसाठी समर सावंत, सिद्धार्थ सावंत आणि वरद नलावडे या तिघांची ‘रत्नागिरी जिल्हा’ संघाकडून निवड झाली आहे. स्थानिक पातळीवर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे हे फळ त्यांना मिळाले आहे.

Shanti real estate 1

पुण्याच्या नामांकित ‘एस.आर.के.’ (SRK) संघात शौर्य सावंतचे स्थान :

अकॅडमीचा प्रतिभावान खेळाडू शौर्य राकेश सावंत याने आपल्या उत्कृष्ट खेळाची चुणूक दाखवत पुण्यातील नामांकित ‘एस.आर.के.’ (SRK) संघात स्थान पटकावले आहे.

वेस्ट झोन (पश्चिम विभाग) संघासाठी दोघांची निवड :

याशिवाय विराज कोळी आणि आद्या चौघुले यांची प्रतिष्ठित ‘वेस्ट झोन’ (पश्चिम विभाग) संघासाठी निवड झाली आहे. विभागीय स्तरावरील संघात रत्नागिरीच्या दोन खेळाडूंची वर्णी लागणे ही अकॅडमीसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे.

शाळा प्रशासन आणि प्रशिक्षकांकडून कौतुक :

या सर्व यशस्वी खेळाडूंचे एस.व्ही.एम. शाळेच्या मुख्याध्यापिका मोनिका जैस्वाल, संपूर्ण एस.व्ही.एम. टीम, मुख्य प्रशिक्षक प्रमोद वानखडे आणि सहाय्यक प्रशिक्षक नवीन सावंत यांनी विशेष अभिनंदन केले आहे. आगामी स्पर्धेतही या खेळाडूंनी अशीच सर्वोत्तम कामगिरी करत जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छा त्यांनी पुढील वाटचालीस दिल्या आहेत.