दर्गा स्टॉपजवळील वळणावर राँग साईडला आलेल्या ट्रकने उडवले; पूर्णगड सागरी पोलिसांत कारवाई
रत्नागिरी: रत्नागिरी ते पावस जाणाऱ्या बायपास मार्गावरील दर्गा स्टॉपजवळील वळणावर भरधाव आणि बेदरकारपणे चालवलेल्या ट्रकने समोरून येणाऱ्या दुचाकीला राँग साईडला येऊन जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यात ट्रकचालकाविरोधात (ratnagiri accident news) रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर आत्माराम चव्हाण (वय ५१, रा. नाणीज, तळवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे, तर ओंकार मधुकर शिंदे (वय ३५, रा. नाखरे, उंबरवाडी, ता. जि. रत्नागिरी) असे अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
नेमकी कशी घडली घटना?
पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, हा अपघात दि. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी २.४५ वाजण्याच्या सुमारास घडला. आरोपी चालक समीर चव्हाण हा आपल्या ताब्यातील मालवाहू ट्रक (क्र. एमएच-०९-सीयू-१९७८) घेऊन रत्नागिरी-पावस बायपास रोडने मार्गस्थ झाला होता. यादरम्यान, दर्गा स्टॉपच्या पुढील वळणावर आला असता, रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत त्याने अत्यंत हयगयीने आणि बेदरकारपणे ट्रक चालवत तो थेट राँग साईडला नेला.

याच वेळी समोरून आपले वाहन घेऊन येणाऱ्या ओंकार शिंदे यांच्या स्प्लेंडर दुचाकीला (क्र. एमएच-०८-एई-७२२९) या भरधाव ट्रकने जोरदार ठोकर दिली. या अपघातात दुचाकीस्वार ओंकार शिंदे यांना शरीरावर लहान-मोठ्या दुखापती झाल्या आहेत. तसेच या अपघातात ट्रक आणि दुचाकी या दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
पोलिसांकडून गुन्हा दाखल
या अपघातानंतर पूर्णगड सागरी पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार वैभव शशिकांत कांबळे (वय ३४) यांनी स्वतः फिर्यादी होत दि. ११ नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी ट्रकचालक समीर चव्हाण याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ (BNS) चे कलम २८१, १२५(अ), १२५(ब) सह मोटार वाहन कायदा (Motor Vehicles Act) कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पूर्णगड सागरी पोलीस करत आहेत.













