दोनवेळा धडक बसल्याने बस रस्त्यावर पलटी; बसमधील अडकलेल्या प्रवाशाला एमआयडीसी अग्निशमन दलाने सुखरूप बाहेर काढले
रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी पुलावर आज पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत भीषण अपघात घडला. गोव्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या एका ट्रकने खासगी लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की ट्रकने या लक्झरी बसला तब्बल २०० मीटरपर्यंत फरफटत नेले आणि त्यानंतर दुसऱ्यांदा धडक बसल्याने बस रस्त्यावर पलटी झाली. या अपघातात एकूण ३० प्रवासी जखमी झाले आहेत.
अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न अन् अडकलेल्या प्रवाशाची सुटका :
पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडताच परिसरात एकच आरडाओरडा सुरू झाला. घटनेची माहिती मिळताच हातखंबा वाहतूक पोलीस आणि लांजा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने पलटी झालेल्या बसमधून जखमी प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. मात्र, अपघाताच्या तीव्रतेमुळे एक प्रवासी बसमध्येच अडकून पडला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी रत्नागिरी एमआयडीसी अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून अडकलेल्या प्रवाशाला सुखरूप बाहेर काढले.

जखमींवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू :
या अपघातात जखमी झालेल्या ३० प्रवाशांपैकी गंभीर व इतर जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयांत हलवण्यात आले आहे:
रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय (सिव्हिल) : ८ प्रवासी दाखल
पाली ग्रामीण रुग्णालय : ११ प्रवासी दाखल
लांजा ग्रामीण रुग्णालय : ३ प्रवासी दाखल
इतर किरकोळ जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.
महामार्गावरील वाहतूक विस्कळीत; सुरक्षेच्या उपाययोजनांची गरज :
अपघातानंतर काही वेळ गोव्याच्या दिशेने जाणारी महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला सारून सध्या दुसऱ्या लेनवरून एकेरी वाहतूक सुरळीत सुरू केली आहे. दरम्यान, अंजणारी पुलावर पथदिव्यांची (लाईटची) व्यवस्था नसल्याने अंधाराचे साम्राज्य असते. तसेच, सध्या थंडीचे दिवस असल्याने या भागात पहाटे दाट धुके असते. त्यामुळे या पुलावर तातडीने प्रकाशव्यवस्था करणे, धुक्याच्या दृष्टीने सुरक्षिततेच्या उपाययोजना राबवणे आणि या परिसरात कायमस्वरूपी रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे असल्याची मागणी प्रवासी व स्थानिकांकडून केली जात आहे.













