NCP merger discussion: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर आमदार अनिल पाटील यांचे स्पष्टीकरण; संजय राऊतांना लगावला टोला

NCP merger discussion: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेवर आमदार अनिल पाटील यांचे स्पष्टीकरण; संजय राऊतांना लगावला टोला

आमच्या आमदारांच्या पिशव्या तयार, राऊतांनी सांगावं कोणत्या पक्षात जायचं?; अनिल पाटलांचा उपरोधिक सवाल

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या (अजित पवार गट आणि शरद पवार गट) विलिनीकरणाबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. यावर विविध पक्षांमधील नेत्यांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे २० ते २२ आमदार फुटणार असल्याचा दावा केला होता. या दाव्यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते तथा आमदार अनिल पाटील (Anil Patil on NCP merger) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली असून त्यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांच्या विधानांचा समाचार घेताना अनिल पाटील म्हणाले की, "संजय राऊत नेहमीच आमचे इतके आमदार त्या पक्षात जाणार आणि तेवढे आमदार या पक्षात जाणार अशी बेसलस (निराधार) विधाने करत असतात. आमच्या आमदारांच्या तर जणू कपड्यांच्या पिशव्या भरून तयारच आहेत आणि त्यांना संजय राऊतांकडे जायचं आहे! त्यामुळे आता संजय राऊत यांनीच आम्हाला सांगावे की आम्ही नेमक्या कोणत्या पक्षात जायचे?" विधान परिषद निवडणुकीच्या वेळेसही राऊतांनी अशाच प्रकारचे दावे केले होते आणि शेवटी ते तोंडावर पडले होते, असे सांगत अनिल पाटील यांनी राष्ट्रवादीचा एकही आमदार कुठेही जाणार नसल्याचा आत्मविश्वास व्यक्त केला.

रोहित पवारांवरही केला कडाडून वार
यावेळी बोलताना आमदार अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावरही निशाणा साधला. पक्षांच्या विलिनीकरणाचा प्रश्न आमच्या पक्षात किंवा स्तरावर कुठेही चर्चेत नाही. जर विलिनीकरणाचा असा कोणताही मुद्दा असेल, तर त्यावर बोलण्याचा मुळात रोहित पवारांना कोणताही अधिकार नाही, असे पाटील म्हणाले. रोहित पवारांनी दुसऱ्यांच्या पक्षात डोकावण्यापेक्षा अगोदर आपला पक्ष तपासावा आणि आपल्या पक्षात नेमके किती आमदार आहेत, याचा आढावा घ्यावा, अशी खोचक टीका त्यांनी केली.

Horizon techno.

तसेच, विलिनीकरणाबद्दल किंवा राजकीय युतीबद्दल बोलायचे झाल्यास, भारतीय जनता पक्ष (BJP) हा एनडीए (NDA) मधील सर्वात मोठा पक्ष आहे आणि भाजपला सोडून कोणतीही चर्चा होऊ शकत नाही, असे स्पष्ट करत एनडीए युतीमधील पक्षांमधील सुसंवाद त्यांनी अधोरेखित केला.