रत्नागिरी जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस; पाणीसाठ्यात घट झाल्याने प्रशासनाची आणि नागरिकांची चिंता वाढली
लांजा: रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी झालेल्या अपुऱ्या पावसामुळे आणि ‘एल निनो’च्या प्रभावामुळे तीव्र पाणीटंचाईचे मोठे संकट ओढवले आहे. लांजा शहर आणि तालुक्यातील पश्चिम भागातील गावांची तहान भागवणारे महत्त्वाचे बेनिखुर्द धरणाचा पाणीसाठा यावर्षी नोव्हेंबर महिन्यातच झपाट्याने कपात होऊ लागल्याने, लांजा शहर व परिसराला भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी सरासरीच्या केवळ ७७ टक्के म्हणजेच सुमारे २,४३९ मिमी पाऊस पडला असून, मागील काही वर्षांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वात कमी आहे. यामध्ये लांजा तालुक्यात केवळ ७०.८० टक्के इतकाच पाऊस नोंदवला गेला आहे. या घटलेल्या पावसामुळे भूजल पातळीवर विपरीत परिणाम झाला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा कमालीचा रोडावला आहे.
लांजा तालुक्यातील धरणांची सद्यस्थिती
सध्या लांजा तालुक्यात एकूण तेरा छोटे-मोठे प्रकल्प असून, यामध्ये खोरनीनको, वेरवली, बर्डेवाडी, बेनिखुर्द, केळंबे, खेरवे, झापडे, कोंडेये, शिपोशी, कुवे, व्हेळ, गवाणे, पन्हळे, हर्दखळे या गावांमध्ये धरणे व पाझर तलावांमध्ये पाणी साठवला गेला आहे. मात्र, वाढत्या उन्हाचा कडाका आणि अपुरा पाऊस यामुळे पाणी धरणांमधून आणि इतर जलाशयांतून झपाट्याने कमी होऊ लागले असून, धरणांमधील पाणीसाठा ३ टक्क्यांनी घसरून ७५ टक्क्यांवर आला आहे.

ग्रामीण भागात नियोजनाची गरज
भूजल पातळीत सातत्याने घट होत असल्याने संभाव्य भीषण पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी तालुका प्रशासनाने पाणी योग्य प्रकारे वापरण्याचे आणि पाणीसाठा बचत करण्याबाबत नागरिकांना सूचना दिल्या आहेत. ग्रामीण व दुर्गम भागात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी जलस्रोतांचे संवर्धन आणि वनराई बंधाऱ्यांवर भर देणे काळाची गरज बनली आहे. वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवण्यासाठी लहान धरणे व बंधारे वेळीच बांधल्यास भविष्यातील जलसंकट टाळता येऊ शकेल, असे तज्ज्ञांचे मत आहे.













