सावर्डेतील अपहृत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मुंबईतून शोध; रत्नागिरी एलसीबीची यशस्वी कामगिरी, संबंधित युवक ताब्यात!

सावर्डेतील अपहृत १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मुंबईतून शोध; रत्नागिरी एलसीबीची यशस्वी कामगिरी, संबंधित युवक ताब्यात!

चार दिवसांच्या संयुक्त शोधमोहिमेनंतर पोलिसांना मोठे यश; सावर्डे परिसरात तणावाच्या पार्श्वभूमीवर तैनात केले होते क्यूआरटी पथक

रत्नागिरी : चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथून अपहरण झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा आणि तिच्यासोबत असलेल्या संबंधित युवकाचा मुंबईतून शोध घेण्यात रत्नागिरी पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला (LCB) मोठे यश आले आहे. शुक्रवार, १३ नोव्हेंबर २०२६ रोजी एलसीबी पथकाने दोघांनाही मुंबईतून ताब्यात घेतले असून, अपहृत मुलीला महिला पोलीस अंमलदारांच्या देखरेखीखाली सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
९ नोव्हेंबरला घडली होती अपहरणाची घटना :
दिनांक ९ नोव्हेंबर २०२६ रोजी सावर्डे (ता. चिपळूण) येथून १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सावर्डे पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा रजिस्टर क्रमांक १५०/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १३७ (२) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

परिसरातील तणाव लक्षात घेता पोलीस दलाची तत्परता :

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या घटनेमुळे सावर्डे परिसरात मोठी चिंता आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांनी तात्काळ सावर्डे येथे घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती हाताळण्यासाठी तत्परतेने हस्तक्षेप केला. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळी क्यूआरटी (Q.R.T.) पथके तैनात करण्यात आली होती.

Nadi pariksha

विशेष शोध पथकांची निर्मिती अन् मुंबईत सापडला माग :

प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी (खेड) श्री. शैलेश सणस, उपविभागीय पोलीस अधिकारी (लांजा) श्री. सुरेश कदम, सावर्डे पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. आबासो पाटील, चिपळूण पोलीस निरीक्षक श्री. फुलचंद मेंगडे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांच्या नेतृत्वाखाली विविध शोध पथके तयार करण्यात आली होती.
सावर्डे, चिपळूण पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी विविध ठिकाणी समांतर शोधमोहीम राबवली. तांत्रिक तपासाच्या आधारे आज, १३ नोव्हेंबर रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने मुंबईतून अपहृत मुलगी आणि संबंधित युवकाला ताब्यात घेतले. संबंधित युवकाविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

यशस्वी कामगिरी करणारे पोलीस पथक :

ही कामगिरी प्रभारी पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक प्रशांत बोरकर, पोलीस हवालदार विजय आंबेकर, योगेश नार्वेकर, वैभव मोरे, चालक पोलीस हवालदार अतुल कांबळे, पोलीस हवालदार दीपराज पाटील, गणेश सावंत आणि सहाय्यक पोलीस फौजदार पांडुरंग गोटे यांच्या पथकाने पार पाडली.