कमी पटसंख्येच्या शाळांच्या विलीनीकरणाच्या चर्चा निराधार; पालक आणि शिक्षकांनी अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
रत्नागिरी: रत्नागिरी (Ratnagiri) जिल्हा परिषदेच्या कमी पटसंख्या असलेल्या प्राथमिक शाळांचे विलीनीकरण किंवा समायोजन केले जाणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. मात्र, या बातम्या पूर्णपणे निराधार आणि वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे स्पष्टीकरण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे यांनी गुरुवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी केले आहे (ratnagiri zilla parishad schools news). पालक, शिक्षक आणि नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.
कमी पटसंख्येच्या शाळा बंद करण्याबाबत किंवा त्यांचे समायोजन करण्याबाबत राज्य शासनामार्फत अद्याप कोणताही शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला नाही. तसेच, रत्नागिरी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यातील कोणत्याही प्राथमिक शाळेचे विलीनीकरण करणे, शाळा बंद करणे अथवा अशा शाळांची यादी तयार करण्याची कोणतीही प्राथमिक कार्यवाही सुरू केलेली नाही, असे शिक्षण विभागाकडून ठामपणे स्पष्ट करण्यात आले आहे.
केवळ अधिकृत माहितीच ग्राह्य धरावी; प्रशासनाचे आवाहन
विद्यार्थी आणि शैक्षणिक हिताशी संबंधित कोणताही निर्णय केवळ राज्य शासनाच्या अधिकृत आदेशानुसारच घेतला जातो. त्यामुळे नागरिकांनी केवळ शासन आणि जिल्हा परिषद प्रशासनाच्या अधिकृत माध्यमांतून येणारी माहितीच ग्राह्य धरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासोबतच, शैक्षणिक क्षेत्रासारख्या संवेदनशील विषयांवर वृत्त प्रसिद्ध करण्यापूर्वी प्रसारमाध्यमांनी संबंधित विभागाकडून वस्तुस्थितीची खातरजमा करून घ्यावी, जेणेकरून पालक व विद्यार्थ्यांमध्ये विनाकारण संभ्रम निर्माण होणार नाही, असेही प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे यांनी स्पष्ट केले आहे.














