Prithviraj Chavan on NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आमची ताकद थोडी कमी होईल; शरद पवारांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे विधान

Prithviraj Chavan on NCP Merger: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आमची ताकद थोडी कमी होईल; शरद पवारांबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचे मोठे विधान

शरद पवार ६० वर्षांनंतर भाजपसोबत जाणार नाहीत, असा चव्हाणांनी व्यक्त केला विश्वास; सोनिया गांधींच्या राजीनाम्याचाही दिला दाखला

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गट पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या विलीनीकरणासंदर्भात वेगवेगळे दावे-प्रतिदावे केले जात असतानाच, आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भूमिकेबाबत मोठे विधान केले आहे (Prithviraj Chavan on NCP merger). जर दोन्ही पक्ष एकत्र येऊन भाजपसोबत गेले, तर मात्र महाविकास आघाडीतील आमची ताकद थोडी कमी होईल, असे स्पष्ट मत चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

शरद पवार रुग्णालयात उपचार घेत असताना अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती, तेव्हापासून विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा सुरुवात झाली. त्यानंतर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अजित पवार हयात असते तर १२ फेब्रुवारी रोजीच विलीनीकरण झाले असते, असा दावा केला होता. यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे २० ते २२ आमदार फुटणार असल्याचा दावा केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते, जो अजित पवार गटाने फेटाळून लावला.

नेमके काय म्हणाले पृथ्वीराज चव्हाण?
या सर्व राजकीय घडामोडींवर भाष्य करताना पृथ्वीराज चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. प्रसारमाध्यमांशी बोलताना चव्हाण म्हणाले की, "जर शरद पवार ६० वर्षांनंतर भाजपसोबत गेले तर तो त्यांचा वैयक्तिक स्वार्थ असेल, परंतु असे होणार नाही. मला नाही वाटत ते असे करतील. शेवटी त्यांचा पक्ष आहे, त्यामुळे निर्णयही त्यांचाच असेल."

Pednekar sankul

पुढे बोलताना चव्हाण यांनी राजकीय समीकरणावर भाष्य करत सांगितले की, "मात्र, दोन्ही पक्ष एकत्र येऊन जर ते तिकडे (भाजपसोबत) गेले, तर मात्र आमची ताकद थोडी कमी होईल आणि तसे झाल्यास देशात दोनच विचारधारा राहतील."

सोनिया गांधींच्या त्यागाची करून दिली आठवण
याच संवादादरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या राजकीय निर्णयाचाही उल्लेख केला. त्यावेळी सोनिया गांधींनी अध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता, परंतु काँग्रेस वर्किंग कमिटीच्या आग्रहाखातर त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला, असे चव्हाण यांनी सांगितले. राजीव गांधींच्या निधनानंतर परत इटलीला येण्याचा त्यांच्यावर दबाव होता, मात्र त्यांनी भारतीय मायभूमीचा स्वीकार केला, अशी आठवणही चव्हाण यांनी यावेळी करून दिली.