Gavkhadi Fisherman Missing: गावखडी समुद्रात मासेमारीला गेलेला ६२ वर्षीय मच्छीमार बेपत्ता; २४ तासांनंतरही शोधकार्य सुरू

Gavkhadi Fisherman Missing: गावखडी समुद्रात मासेमारीला गेलेला ६२ वर्षीय मच्छीमार बेपत्ता; २४ तासांनंतरही शोधकार्य सुरू

पाण्याचा अंदाज न आल्याने घडली दुर्घटना; लाटेच्या प्रवाहामुळे बाहेर फेकले गेल्याने सहकारी सुदैवाने बचावला

पावस (रत्नागिरी): Gavkhadi Fisherman Missing रत्नागिरी तालुक्यातील पावस नजीक असलेल्या गावखडी समुद्रकिनारी मासेमारीसाठी गेलेले ६२ वर्षीय मच्छीमार समुद्रात बुडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. श्रीधर भिवा मुडे (वय ६२, रा. पेटकर भोजेवाडी, गावखडी) असे या बेपत्ता झालेल्या मच्छीमाराचे नाव आहे. गुरुवारी (दि. १२ नोव्हेंबर) सायंकाळी ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली असून, घटनेला २४ तास उलटून गेल्यानंतरही त्यांचा शोध लागलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीधर मुडे आणि त्यांचे सहकारी मारुती रघुनाथ भोजे (वय ६८, रा. पेटकर भोजेवाडी, गावखडी) हे दोघेही गुरुवारी सायंकाळी गावखडी समुद्रकिनारी मासेमारी करत होते. मासेमारी करत असताना अचानक पाण्याचा अंदाज न आल्याने श्रीधर मुडे हे खोल समुद्रात बुडाले. मात्र, त्यांच्यासोबत असलेले सहकारी मारुती भोजे यांना समुद्राच्या लाटेच्या जोरदार प्रवाहामुळे किनाऱ्याच्या दिशेने बाहेर फेकले गेल्याने ते सुदैवाने बचावले आहेत.

ग्रामस्थ, ग्रामरक्षक दल आणि पोलिसांकडून शोधमोहीम
गावच्या पोलीस पाटील साक्षी मुडे यांनी या घटनेची माहिती प्रशासनाला दिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, ग्रामरक्षक दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत समुद्रकिनारी शोधकार्य सुरू केले. पूर्णगड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, बेपत्ता मच्छीमार श्रीधर मुडे यांचा संपूर्ण परिसरात युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे.

Shoping fiesta

श्रीधर मुडे हे व्यवसायाने मच्छीमार असून त्यांच्या पश्चात पाच मुली असा परिवार आहे. उदरनिर्वाहासाठी मासेमारी करत असताना घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे गावखडी गावासह संपूर्ण परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.