अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न लागणार मार्गी; उद्या रविवारी पालकमंत्री उदय सामंत करणार प्रत्यक्ष पाहणी, बाधित नागरिकांशी साधणार संवाद
रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेतील वाहतूक कोंडी आणि अरुंद रस्त्यांची समस्या आता कायमची सुटण्याच्या मार्गावर आहे. शहरातील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या स्वातंत्र्य लक्ष्मी चौक ते तेली आळी नाका या रस्त्याचे लवकरच रुंदीकरण होणार आहे. या भागातील रहिवाशांनी केलेल्या मागणीची दखल घेत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न आता मार्गी लागणार असून, पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली महत्त्वाची बैठक :
या रस्ता रुंदीकरणाच्या अनुषंगाने कालच (शुक्रवारी) रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला या परिसरातील बाधित नागरिक उपस्थित होते. बैठकीतील चर्चेनंतर आता या रस्त्यावरील बाधित होणाऱ्या सुमारे ४० नागरिकांना पुढील बैठकीबाबत अधिकृत नोटीस पाठवण्यात आली आहे.

उद्या रविवारी प्रत्यक्ष पाहणी आणि हनुमान मंदिरात बैठक :
प्रशासकीय पातळीवर निर्णय घेण्यापूर्वी नागरिकांच्या भावना आणि अडचणी समजून घेण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत उद्या, रविवारी स्वतः या रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. तसेच, या परिसरातील हनुमान मंदिरात पालकमंत्र्यांच्या समवेत स्थानिक व बाधित नागरिकांची प्राथमिक बैठक होणार असून, यामध्ये ते नागरिकांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेणार आहेत.
बाजारपेठेतील व्यवसायाला मिळणार मोठी चालना :
सध्या रत्नागिरीच्या मुख्य बाजारपेठेतील रस्ते अत्यंत अरुंद असल्याने आणि वाहतूक कोंडी होत असल्याने अनेक ग्राहक बाजारपेठेत येणे टाळतात. याचा मोठा फटका स्थानिक व्यापारावर होत असल्याचे चित्र आहे. मात्र, स्वातंत्र्य लक्ष्मी चौक ते तेली आळी नाका या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास ग्राहकांची ये-जा सुलभ होईल आणि संपूर्ण बाजारपेठेतील व्यवसायाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास येथील व्यापारी वर्गाने व्यक्त केला आहे.













