किशोर फर्निचर मार्टच्या एक्सचेंज योजनेतील २२ फ्रीज आणि ३ वॉशिंग मशीन आगीच्या भक्ष्यस्थानी
दापोली (जि. रत्नागिरी): Dapoli Fire Incident मध्ये शहरातील पोस्टाची आळी परिसरातील सुर्वे कंपाऊंड येथे ठेवलेल्या किशोर फर्निचर मार्टच्या साहित्यावर फटाका पडून लागलेल्या आगीत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी सायंकाळी ही घटना घडली असून, घटनेचे गांभीर्य ओळखून परिसरातील नागरिकांनी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणल्याने संभाव्य मोठा अनर्थ टळला.
दिवाळीच्या कालावधीत किशोर फर्निचर मार्टने एक्सचेंज योजनेंतर्गत ग्राहकांकडून जुने फ्रीज व इतर साहित्य घेतले होते. सुर्वे कंपाऊंड येथील मोकळ्या जागेत हे साहित्य ठेवण्यात आले होते. या ठिकाणी जवळपास २२ फ्रीज आणि ३ वॉशिंग मशीन असा साठा होता. शनिवारी सायंकाळी या साहित्यावर फटाका पडल्याने अचानक आग लागली आणि पाहता पाहता आगीने या इलेक्ट्रॉनिक साहित्याला वेढले.
आग लागल्याचे निदर्शनास येताच आजूबाजूच्या नागरिकांनी कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. आगीची तीव्रता कमी करण्यासाठी लगतच्या विहिरीला तातडीने पंप लावून पाण्याचा उपसा करण्यात आला. याच दरम्यान, जालगाव येथील धोपट यांचा पाण्याचा टँकरही मदतकार्यासाठी घटनास्थळी दाखल झाला. विहिरीचे पाणी आणि टँकरच्या साहाय्याने सातत्याने पाण्याचा मारा केल्यामुळे काही वेळातच आग पूर्णपणे आटोक्यात आली.

घटनेची माहिती मिळताच दापोली नगरपंचायतीची मोटारसायकलवरील अद्ययावत अग्निशमन यंत्रणाही घटनास्थळी पोहोचली. मात्र, प्रशासकीय यंत्रणा पोहोचेपर्यंत स्थानिक नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांतून आणि टँकरच्या मदतीने आग विझवण्यात यश आले होते. या आगीच्या घटनेत किशोर फर्निचर मार्टचे सुमारे दोन लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची माहिती दिनेश जैन यांनी दिली आहे. भरवस्तीच्या परिसरात लागलेली ही आग वेळेत विझवण्यात आल्याने दापोलीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.













