रस्ता रुंदीकरण करताना कुणाचेही नुकसान होऊ देऊ नका; पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना!

रस्ता रुंदीकरण करताना कुणाचेही नुकसान होऊ देऊ नका; पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना!

स्वातंत्र्य लक्ष्मी चौक ते तेली आळी नाका रस्त्याची पायी चालत पाहणी; जादा एफएसआय किंवा योग्य मोबदला देऊन बाधित जागा मालकांना न्याय देणार

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील मुख्य बाजारपेठेतील स्वातंत्र्य लक्ष्मी चौक ते तेली आळी नाका या रस्त्याचे रुंदीकरण करताना कोणत्याही नागरिकाचे किंवा व्यापाऱ्याचे नुकसान होऊन कुणीही उद्ध्वस्त होणार नाही, याची प्रामुख्याने काळजी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना राज्याचे उद्योगमंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी आज प्रशासनाला दिल्या. आज रविवारी पालकमंत्र्यांनी या संपूर्ण मार्गावर पायी चालत प्रत्यक्ष पाहणी दौरा केला आणि स्थानिक व बाधित नागरिकांचे म्हणणे सविस्तरपणे ऐकून घेतले.

पायी चालत केली पाहणी; रुंदीकरणाच्या पर्यायांवर सविस्तर चर्चा :

या पाहणी दौऱ्यात पालकमंत्री उदय सामंत यांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूंची परिस्थिती जाणून घेत अधिकाऱ्यांशी चर्चा केली:

Mobile hub

स्वातंत्र्य लक्ष्मी चौक ते पोस्ट ऑफिस : या टप्प्यातील रस्त्याच्या रुंदीकरणाच्या दृष्टीने फारशा तांत्रिक अडचणी नसल्याचे पाहणीत दिसून आले.

पोस्ट ऑफिस ते तांबट आळी नियोजित मार्ग : या नियोजित रस्त्याच्या मध्ये एक घर येत असून, संबंधित घरमालकांशी संवाद साधून त्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई कशी देता येईल याचा विचार करावा, अशा सूचना सामंत यांनी दिल्या.

पोस्ट ऑफिस ते गोखले नाका : या भागातील रस्ता दोन्ही बाजूंची ५ ते १० फूट जागा घेऊन सहजपणे रुंद करता येईल, असे निदर्शनास आले.

मारुती आळी ते तेली आळी नाका : येथील नागरिकांनीही रुंदीकरणासाठी अत्यंत सकारात्मक भूमिका दर्शवली आहे. मारुती मंदिराच्या बाजूने ५ फूट आणि समोरील बाजूने १० फूट जागा रुंदीकरणासाठी घ्यावी, अशी व्यावहारिक भूमिका काही नागरिकांनी मांडली.

प्रथम मार्किंग, त्यानंतर ३१ जागा मालकांची प्राथमिक बैठक :

या पाहणीतील चर्चेनुसार नेमकी कोणाची किती जागा बाधित होऊ शकते हे स्पष्ट होण्यासाठी प्रशासनातर्फे प्रथम रस्त्यावर मार्किंग करण्यात येणार आहे. मार्किंग पूर्ण झाल्यानंतर येथील बाधित होणाऱ्या ३१ जागा मालकांची प्राथमिक बैठक आयोजित केली जाईल आणि त्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत अंतिम निर्णयासाठी पुढील बैठक पार पडणार आहे.

जादा एफएसआय किंवा जागेचा मोबदला देण्यास प्राधान्य :

कोणत्याही जागा मालकावर अन्याय होऊ नये म्हणून प्रत्येकाला जादा एफएसआय (FSI) किंवा जागेचा योग्य आर्थिक मोबदला देऊन कसा न्याय देता येईल, याचा प्राधान्याने विचार करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

पदाधिकारी, अधिकारी आणि नागरिकांची मोठी उपस्थिती :

या पाहणी दौऱ्यात पालकमंत्री उदय सामंत यांच्यासमवेत नगरपालिका मुख्याधिकारी गारवे व अन्य अधिकारी, उपनगराध्यक्ष समीर तिवरेकर, ज्येष्ठ नगरसेवक राजन शेट्ये, नगरसेवक राजू तोडणकर, नगरसेवक निमेश नायर, नगरसेवक विजय खेडेकर, बाधित व्यापारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.