आरे-वारे येथील झिपलाईन प्रकारावर ‘ओशन फ्लाय झिपलाईन’चे अधिकृत स्पष्टीकरण; “सुरक्षिततेत कोणतीही तडजोड नाही, मतलई वाऱ्यांमुळे केवळ खबरदारीचा उपाय!”

आरे-वारे येथील झिपलाईन प्रकारावर ‘ओशन फ्लाय झिपलाईन’चे अधिकृत स्पष्टीकरण; “सुरक्षिततेत कोणतीही तडजोड नाही, मतलई वाऱ्यांमुळे केवळ खबरदारीचा उपाय!”

महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाची मान्यता आणि युरोपियन स्टँडर्ड सेटअप; पर्यटकांना आधीच पूर्वकल्पना देऊनच केले जाते रजिस्ट्रेशन

रत्नागिरी : आरे-वारे समुद्रकिनारी सुरू असलेल्या झिपलाईन संदर्भात कालपासून सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर आता ‘ओशन फ्लाय झिपलाईन’ व्यवस्थापनाकडून अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. झिपलाईनची संपूर्ण यंत्रणा ही आंतरराष्ट्रीय दर्जाची व पूर्णपणे सुरक्षित असून, सध्या सुरू असलेल्या तीव्र ‘मतलई वाऱ्यांमुळे’ (Land Breeze) उद्भवणाऱ्या परिस्थितीत कर्मचाऱ्यांकडूनच सेफ्टी रोपच्या साहाय्याने पर्यटकांना सुरक्षित लँडिंग टॉवरवर आणले जाते. या प्रक्रियेत कोणत्याही पर्यटकाची किंवा स्थानिकांची मदत घेतली जात नसल्याचे व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.

युरोपियन स्टँडर्ड सेटअप आणि पर्यटन संचालनालयाची मान्यता :

स्पष्टीकरणात म्हटले आहे की, ओशन फ्लाय झिपलाईन २०२१ पासून आरे-वारे येथे कार्यरत असून अल्पवधीतच ती पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहे. रत्नागिरीच्या पर्यटन वृद्धीत या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीचा मोलाचा वाटा आहे. या झिपलाईनचा सेटअप संपूर्णपणे युरोपियन स्टँडर्डचा असून, त्यास महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाची (MTDC) अधिकृत मान्यता आहे. शासनाने घालून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून अनुभवी व सर्टिफाईड तज्ज्ञांच्या देखरेखेखालीच ही ॲक्टिव्हिटी राबवली जाते.

Arihant 3

भारतातील पहिली समुद्रावरील ‘ड्युअल केबल’ झिपलाईन :

देशात सुरक्षेसाठी नावाजलेल्या मोजक्याच ‘ड्युअल केबल’ प्रकारच्या झिपलाईनमध्ये आरे-वारे येथील झिपलाईनचा समावेश होतो. विशेष म्हणजे, ही भारतातील पहिलीच समुद्रावरील झिपलाईन आहे. पर्यटकांच्या अधिक सुरक्षेसाठी येथे एक ‘एक्स्ट्रा रेस्क्यू रोप’ इन्स्टॉल करण्यात आला असून, त्यामुळेच गेल्या पाच वर्षांत येथे एकाही दुर्घटनेची नोंद झालेली नाही. या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणावर उपकरणांमध्ये गुंतवणूक करूनही मनाली, हिमाचल, पुणे आणि मुंबई परिसरातील झिपलाईनच्या तुलनेत येथे कमी दर आकारले जातात आणि गेल्या पाच वर्षांपासून दरात कोणतीही वाढ केलेली नाही, असेही कंपनीने नमूद केले आहे.

मतलई वाऱ्यांमुळे होणारा अडथळा आणि सुरक्षेची प्रक्रिया :

झिपलाईन हा क्रीडा प्रकार वाऱ्याच्या दिशेवर आणि वेगावर अवलंबून असतो. सध्या कोकण किनारपट्टीवर सकाळच्या सत्रात तीव्र ‘मतलई वारे’ (Land Breeze – भूमीय वारे) वाहत आहेत. गेल्या आठवडाभरापासून सकाळच्या सत्रात या वाऱ्यांचा वेग जास्त असल्याने झिपलाईन ॲक्टिव्हिटी शेवटच्या टप्प्यात पूर्ण होण्यास काहीसा अडथळा निर्माण होत आहे. अशा वेळी खबरदारीचा उपाय म्हणून लँडिंग टॉवरपासून सुमारे ५० फुटांवर थांबलेल्या पर्यटकांना झिपलाईनचे प्रशिक्षित कर्मचारीच सेफ्टी रोप देऊन सुरक्षितपणे लँडिंग टॉवरवर आणतात.

पूर्वकल्पना आणि संमतीनंतरच रजिस्ट्रेशन :

सोशल मीडियावरील बातमीत स्थानिक किंवा पर्यटकांची मदत घेतल्याचा जो उल्लेख केला आहे, तो चुकीचा असल्याचे व्यवस्थापनाने म्हटले आहे. या संपूर्ण प्रक्रियेची आणि वाऱ्याच्या स्थितीची पूर्वकल्पना पर्यटकांना ‘मेन टॉवर’वरच दिली जाते. पर्यटकांची लेखी व स्पष्ट संमती असल्यानंतरच त्यांचे रजिस्ट्रेशन करून त्यांना झिपलाईन करण्यास दिले जाते, असेही ओशन फ्लाय झिपलाईनच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.