जल, जंगल आणि जमिनीचे रक्षण आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदान प्रेरणादायी; प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण
*रत्नागिरी *: Birsa Munda Jayanti निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात रविवारी क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी राहुल गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी तसेच देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात भगवान बिरसा मुंडा यांनी दिलेले योगदान अत्यंत अतुलनीय व भावी पिढ्यांसाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी जिल्ह्यात १८ नोव्हेंबरअखेर ‘जनजातीय गौरव दिन सेवा सप्ताह’ राबविण्यात येत आहे. या सेवा सप्ताहादरम्यान शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती आणि त्यांचे प्रत्यक्ष लाभ तळागाळातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासकीय स्तरावर विशेष प्रयत्न केले जात आहेत. आदिवासी बांधव व जनजातीय घटकांपर्यंत शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.














