ठाणे महानगरपालिकेच्या ‘टीडीआरएफ’च्या धर्तीवर होणार स्थापना; आपत्कालीन घटनांमध्ये ‘गोल्डन अवर’मध्ये मदत मिळण्याचा मार्ग सुकर
रत्नागिरी: Ratnagiri Municipal RDRF Team या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत अतिवृष्टी, पूर, दरड कोसळणे आणि आगीसारख्या आपत्तींचा तातडीने सामना करण्यासाठी रत्नागिरी नगरपालिकेचे स्वतःचे स्वतंत्र आपत्ती निवारण पथक अर्थात ‘आरडीआरएफ’ (RDRF) स्थापन करण्यात येणार आहे. १५ प्रशिक्षित जवानांचा समावेश असलेल्या या पथकाची स्थापना ठाणे महानगरपालिकेच्या ‘टीडीआरएफ’च्या धर्तीवर केली जाणार असून, राज्यातील नगरपालिकांमध्ये अशा प्रकारचे पथक उभारणारी रत्नागिरी ही पहिली नगरपालिका ठरेल, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, सिन्धुरत्न योजनेचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. विनय नातू आदी उपस्थित होते. कोकणातील भौगोलिक परिस्थिती पाहता पावसाळ्यात रत्नागिरी जिल्ह्याला दरवर्षी पूर आणि दरड कोसळण्याच्या घटनांचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर आगीच्या घटनांमध्येही वाढ होत असून, अशा आपत्तीच्या वेळी एनडीआरएफ किंवा एसडीआरएफची पथके दाखल होईपर्यंत स्थानिक पातळीवर तातडीने मदतकार्य सुरू होणे आवश्यक असते. ही गरज लक्षात घेऊन नगरपालिकेच्या माध्यमातून १५ जवानांचे स्वतंत्र पथक उभारण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. ठाणे महानगरपालिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अशा प्रकारचा आपत्ती व्यवस्थापन पथक कार्यरत आहे, त्याच धर्तीवर रत्नागिरी नगरपालिकेचे पथक तयार केले जाणार आहे. यासंदर्भातील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने सुरू असून लवकरच हे पथक रत्नागिरीकरांच्या सेवेत दाखल होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
बचावकार्यासाठी आधुनिक यंत्रसामग्री

या पथकातील १५ सदस्यांना आपत्ती व्यवस्थापन आणि बचावकार्याचे विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.
आग लागल्यास बचावकार्य करणे, पूरस्थितीत बोटी चालवणे, दरडीखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणे, रस्त्यावरील अडथळे दूर करणे तसेच प्रथमोपचार देण्याचे प्रशिक्षण त्यांना मिळणार आहे.
त्यासाठी आवश्यक आधुनिक यंत्रसामग्रीही पथकाला उपलब्ध करून दिली जाणार आहे.
आपत्कालीन घटना घडताच ‘गोल्डन अवर’मध्ये घटनास्थळी पोहोचून जीवित आणि वित्तहानी रोखणे, हे या पथकाचे प्रमुख उद्दिष्ट असेल.
त्यामुळे आपत्तीच्या काळात रत्नागिरी शहराला स्थानिक पातळीवरच तातडीची मदत उपलब्ध होणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.













