शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सुक्या कचऱ्याच्या गोदामाला आग लागून मोठे नुकसान; दोन पाण्याच्या टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
रत्नागिरी: Ratnagiri MIDC Fire घटनेत शहरातील मिरजोळे एमआयडीसी परिसरातील ‘रत्नाग्रीन टेक्नो सर्व्हिसेस’ या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या गोदामाला शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागून गोदाम जळून खाक झाले. गोदामात साठवून ठेवलेल्या मोठ्या प्रमाणातील सुक्या कचऱ्याने पेट घेतल्याने काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले; मात्र एमआयडीसी अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवल्याने प्रकल्पातील बायोगॅस युनिट आणि लगतचा औद्योगिक परिसर सुरक्षित राहिला.
मनीष आपटे यांच्या मालकीच्या या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात ओला कचरा जिरवणारे युनिट, बायोगॅस प्रकल्प तसेच सुका कचरा संकलन आणि प्रक्रियेचे काम केले जाते. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास प्रकल्पाच्या गोदामातील कचऱ्याने अचानक पेट घेतला. आत मोठ्या प्रमाणावर सुका कचरा साठवलेला असल्याने आगीचा मोठा भडका उडाला. आकाशात पसरलेले धुराचे उंच लोळ आणि आगीच्या ज्वाळा लांब अंतरावरूनही स्पष्टपणे दिसत असल्याने मिरजोळे एमआयडीसी परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
आगीची माहिती मिळताच एमआयडीसी अग्निशमन दलाचे पथक अग्निशमन बंबासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तात्काळ पाण्याचा मारा करत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, गोदामात कचऱ्याचे मोठे ढिगारे साचलेले असल्याने आग आतल्या बाजूने धुमसत होती आणि तिची तीव्रता अधिक होती. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन दलाने त्वरित पाण्याचा दुसरा टँकर घटनास्थळी पाचारण केला.

अग्निशमन दलाच्या जवानांनी सलग शर्थीचे प्रयत्न करत दोन्ही टँकरच्या साहाय्याने आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. प्रशासकीय यंत्रणेची मदत वेळीच पोहोचल्याने आगीच्या ज्वाळा प्रकल्पातील संवेदनशील बायोगॅस युनिटपर्यंत किंवा आजूबाजूच्या इतर कंपन्यांपर्यंत पोहोचल्या नाहीत, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या घटनेत नेमके किती आर्थिक नुकसान झाले आहे, याचा अंदाज घेण्याचे काम सुरू आहे.













