उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलाहरी आणि दक्षिणेकडून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे तापमानात घट; १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान थंडी वाढण्याचा अंदाज
पुणे: Cold Weather Alert Maharashtra च्या पार्श्वभूमीवर, बंगालच्या उपसागरात ‘अक्वान’ नावाचे चक्रिवादळ सोमवारी (दि. १६) तयार होणार असून मंगळवारी त्याचा वेग वाढणार आहे. या चक्रिवादळामुळे दक्षिण किनारपट्टीला १७ ते २२ नोव्हेंबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्रात २० आणि २१ रोजी फक्त पूर्व विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उत्तर भारताकडून थंडी आणि दक्षिणेकडून बाष्पयुक्त वारे राज्यात येत असल्याने महाराष्ट्रात थंडीत मोठी वाढ होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. रविवारी पुण्यात १०.२ अंश सेल्सिअस इतके राज्यामध्ये नीचांकी तापमान नोंदवले गेले.
हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी आग्नेय बंगाल उपसागरावरील कमी दाबाचे क्षेत्र उत्तर-वायव्य दिशेने सरकले आहे. सोमवारी दक्षिण व लगतच्या पश्चिम मध्य बंगाल उपसागराच्या मध्यवर्ती भागांवर त्याचे चक्रिवादळात रूपांतर होईल आणि १७ नोव्हेंबर रोजी पश्चिम मध्य बंगाल उपसागरावर तीव्र चक्रिवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच्या दोन दिवसांत ते आणखी तीव्र होऊन वायव्य दिशेने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
उत्तर भारतात सध्या दाट ते अतिदाट धुके तयार होत असून पहाटे आणि रात्रीच्या वेळी दृश्यमानता कमी होत आहे. या शीतलाहरी महाराष्ट्रात येत असून एका बाजूला दक्षिण भारताकडून बाष्पयुक्त वारे राज्यात प्रवेश करत आहेत. या दोन्ही वाऱ्यांचा संगम राज्यावर होत असल्यामुळे १६ ते २० नोव्हेंबर दरम्यान राज्यात थंडी वाढून किमान तापमानात मोठी घट होईल, असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी दिला आहे.














