Mumbai-Goa Highway Accident: अंजणारी अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Mumbai-Goa Highway Accident: अंजणारी अपघातातील जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू; महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

२१ कोटींच्या उड्डाणपुलाचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत असताना अपघातांची मालिका सुरूच

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी येथे १३ नोव्हेंबर रोजी पहाटे झालेल्या भीषण ट्रॅव्हल्स-ट्रक अपघातातील जखमींपैकी आणखी एका तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. रघुवीर बाळकृष्ण म्हसूरकर (वय ३३, रा. आडवशी तांबळवाडी, ता. मालवण, जि. सिंधुदुर्ग) असे मृत तरुणाचे नाव असून, रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या अवघ्या ३३ व्या वर्षी झालेल्या या निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, आडवशी तांबळवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

१३ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास अंजणारी पुलाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर प्रवासी ट्रॅव्हल्स आणि भरधाव १६ चाकी ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला होता. ट्रॅव्हल्समधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मागून आलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता अत्यंत भीषण असल्याने दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात ट्रॅव्हल्समधील २२ प्रवासी आणि ट्रकचालक असे एकूण २३ जण जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच मदतकार्य राबवून जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दुर्घटनेत गंभीर जखमी झालेल्या रघुवीर म्हसूरकर यांच्यावर रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय उपचार सुरू होते, परंतु उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. या नव्या मृतामुळे अंजणारी अपघातातील भीषणता आणखी वाढली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अंजणारी घाटातील धोकादायक वळण आणि तीव्र उतार वाहनचालकांसाठी सातत्याने जीवघेणे ठरत आहेत. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी होत असून, आता सुमारे २१ कोटी रुपये खर्चून १०० मीटर लांबीचा स्वतंत्र उड्डाणपूल उभारण्याचे नियोजन समोर आले आहे. त्यासाठीचा सुधारित प्रस्ताव मंजुरीसाठी मंत्रालयाकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे या धोकादायक वळणाला पर्याय मिळण्याची आशा निर्माण झाली असली, तरी प्रस्ताव पाठविण्यापलीकडे प्रत्यक्ष कामाला कधी सुरुवात होणार, हा कळीचा मुद्दा बनला आहे. अंजणारीच्या उतारावर अपघातांची मालिका सुरूच असताना शासन आणि प्रशासनाने केवळ प्रस्तावांच्या पातळीवर न थांबता तातडीने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे.

Pednekar sankul

काही दिवसांपूर्वी हातखंबा टॅब परिसरात पोलिसांच्या वाहनाचा अपघात होऊन एका पोलीस कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला होता. ही दुर्घटना ताजी असतानाच अंजणारी येथे पुन्हा भीषण अपघात घडला. वारंवार घडणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे महामार्गाच्या रचनेतील संभाव्य तांत्रिक त्रुटींची तपासणी करून उड्डाणपुलाच्या प्रस्तावाला त्वरित मंजुरी देण्याची मागणी जोर धरत आहे. आणखी किती निष्पाप जीव गमावल्यानंतर या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना होणार, असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.