प्रिंटिंग क्षेत्रातील नावाजलेले उद्योजक आणि ‘जाणीव फाउंडेशन’चे सचिव म्हणून १७ वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग
रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रिंटिंग व ग्राफिक्स डिझायनिंग क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक, ‘श्रावणी ग्राफिक्स’चे संचालक तसेच ‘जाणीव फाउंडेशन’चे सचिव उमेश दत्तात्रय महामुनी (वय ५३) यांचे आज (सोमवार, दि. १६ नोव्हेंबर २०२६) दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने रत्नागिरीतील व्यावसायिक, कला आणि सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात केले होते दाखल :
उमेश महामुनी यांना आज सकाळी अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. यापूर्वी त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
उद्योजकतेसोबतच १७ वर्षे सामाजिक कार्याचा वसा :
एक मनमिळावू आणि हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून उमेश महामुनी सर्वपरिचित होते. ‘श्रावणी ग्राफिक्स’च्या माध्यमातून त्यांनी प्रिंटिंग आणि डिझायनिंग क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवत मोठा नावलौकिक मिळवला होता. व्यावसायिक जबाबदाऱ्या यशस्वीरीत्या सांभाळतानाच त्यांनी सामाजिक बांधिलकीही तितक्याच निष्ठेने जपली. ‘जाणीव फाउंडेशन’चे सचिव म्हणून ते गेली १७ वर्षे सामाजिक क्षेत्रात अत्यंत सक्रियपणे योगदान देत होते. संस्थेच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये त्यांचा नेहमीच पुढाकार असायचा.
त्यांच्या पश्चात पत्नी वैशाली, मुलगी श्रावणी, आई कल्पना दत्तात्रय महामुनी आणि भाऊ तेजस असा परिवार आहे.














