Ratnagiri News: ऐतिहासिक वारसा जपणाऱ्यांना युवासेनेचे बळ; गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविणाऱ्या शिवप्रेमींचा सन्मान

Ratnagiri News: ऐतिहासिक वारसा जपणाऱ्यांना युवासेनेचे बळ; गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविणाऱ्या शिवप्रेमींचा सन्मान

युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी यांचा पुढाकार; रत्नागिरी तालुक्यातील १० ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन शिवप्रेमींचा गौरव

रत्नागिरी: छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रेरणादायी इतिहास जतन करण्यासाठी आणि तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात एका नाविन्यपूर्ण उपक्रमाची सुरुवात झाली आहे. पालकमंत्री डॉ. उदय सामंत, आमदार किरण सामंत आणि युवासेनेचे कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक, सचिव विकास गोगावले, कार्यकारिणी सदस्य अपुर्वा सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी यांच्या पुढाकाराने रत्नागिरी तालुक्यात गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारणाऱ्या शिवप्रेमींचा जागेवर जाऊन सन्मान करण्यात येत आहे. ऐतिहासिक वारसा जपणाऱ्यांना युवासेनेचे बळ देण्याच्या उद्देशाने ही मोहीम हाती घेण्यात आली असून, याद्वारे दुर्गप्रेमींच्या कलागुणांना हक्काचे प्रोत्साहन मिळत आहे.

गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती बनविणाऱ्यांचा सन्मान
दिवाळीच्या कालावधीत अनेक तरुण, ग्रुप आणि शिवप्रेमी आपल्या घरासमोर किंवा परिसरात मोठ्या मेहनतीने गड-किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती साकारतात. हाच ऐतिहासिक वारसा पुढे चालवणाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी युवासेनेने यापूर्वी रत्नागिरी तालुक्यात सलग दोन वर्षे किल्ले बनविण्याची स्पर्धा आयोजित केली होती. यंदा मात्र केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न राहता, या शिवप्रेमींच्या घरी किंवा जागेवर प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचा गौरव करण्याचा वेगळा पायंडा पाडण्यात आला आहे. युवासेनेचे जिल्हाप्रमुख तुषार साळवी आणि तालुकाप्रमुख हर्षराज पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आतापर्यंत रत्नागिरी तालुक्यातील सुमारे १० वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या-मोठ्या किल्ल्यांच्या प्रतिकृतींना भेटी दिल्या आहेत.

पन्हाळा, विशाळगड आणि पावनखिंडीच्या आकर्षक प्रतिकृतींचे दर्शन
या मोहिमेदरम्यान रत्नागिरी तालुक्यातील विविध भागांतील कलागुणांचे दर्शन घडले आहे. यामध्ये खेडशी येथील ‘शिवशक्ती ग्रुप’, कोळंबे येथील ‘बागावडितला बागानेश्वर ग्रुप’ तसेच नाचणे परिसरातील वैयक्तिक पातळीवर किल्ले जतन करणारे दुर्गप्रेमी यांच्याशी युवासेनेच्या पथकाने संवाद साधला. या भेटींमध्ये शिवप्रेमींनी साकारलेल्या पन्हाळा, विशाळगड आणि पावनखिंड या ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या आकर्षक आणि हुबेहूब प्रतिकृती पाहावयास मिळाल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असलेली निष्ठा आणि गड-किल्ल्यांविषयीचे प्रेम या प्रतिकृतींच्या माध्यमातून स्पष्टपणे दिसून आले.

Shanti 3

दक्षिण जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये मोहीम विस्तारणार
हा उपक्रम अधिक व्यापक करण्यासाठी युवासेनेचे अभिजीत घोडके, प्रशांत चाळके, प्रथमेश पाटील, रितेश साळवी, चैतन्य झाडगावकर, नंदकुमार कुवर, गणेश शिंदे, वैभव कांबळे, अमेय शिवलकर आणि संजय नाईक हे मेहनत घेत आहेत. "युवकांनी बनविलेल्या गड-किल्ल्यांना नागरिकांनी आवर्जून भेट द्यावी आणि त्यांचा सन्मान करावा. तसेच या माध्यमातून ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या हातांना बळ देण्याचे काम करावे. जे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना करीत आहे," असा विश्वास युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी यांनी व्यक्त केला आहे. येत्या काळात हा उपक्रम युवासेनेच्या माध्यमातून दक्षिण जिल्ह्यातील पाचही तालुक्यांमध्ये राबवण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे.