रत्नागिरीच्या ‘नासा’ पॅटर्नच्या शिरपेचात मानाचा तुरा! जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवले ‘ॲमेझॉन’च्या सॅटेलाईटचे थेट प्रक्षेपण

रत्नागिरीच्या ‘नासा’ पॅटर्नच्या शिरपेचात मानाचा तुरा! जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवले ‘ॲमेझॉन’च्या सॅटेलाईटचे थेट प्रक्षेपण

पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या संकल्पनेतील अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांना मिळाली दुर्मिळ संधी; केनेडी स्पेस सेंटरमध्ये अविस्मरणीय क्षण अनुभवल्यानंतर विद्यार्थ्यांनी मानले आभार

रत्नागिरी : राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या ‘रत्नागिरी पॅटर्न’च्या जिल्हा परिषद शाळांच्या ‘नासा’ (NASA) अभ्यास दौऱ्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या दौऱ्याच्या सलग चौथ्या वर्षी अमेरिकेला गेलेल्या रत्नागिरीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना केनेडी स्पेस सेंटरला भेट दिली असता, चक्क ‘ॲमेझॉन’ (Amazon) कंपनीच्या सॅटेलाईटचे थेट प्रक्षेपण (रॉकेट लाँच) पाहण्याची दुर्मिळ संधी मिळाली आहे. हा अविस्मरणीय अनुभव घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी पालकमंत्री उदय सामंत यांचे मनापासून आभार मानले आहेत.

पैसे देऊनही न मिळणारी दुर्मिळ संधी ग्रामीण विद्यार्थ्यांना लाभली :

केनेडी स्पेस सेंटरमध्ये प्रत्यक्ष रॉकेट किंवा सॅटेलाईट लाँच पाहण्याची संधी सर्वसामान्यांना पैसे देऊनही सहज मिळत नाही. मात्र, रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांमधून गेलेल्या विद्यार्थ्यांच्या भेटीदरम्यानच ॲमेझॉन कंपनीचा सॅटेलाईट अवकाशात झेपावला. हा एक अत्यंत दुर्मिळ असा ‘दुग्धशर्करा योग’ जुळून आल्याने सर्व विद्यार्थी आणि सोबत गेलेले अधिकारी भारावून गेले. पालकमंत्री उदय सामंत यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांच्या अंतराळ संशोधनाच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी सुरू केलेल्या या उपक्रमाचे हे मोठे यश मानले जात आहे.

Jadhav acadamy

ऐनवेळी आलेले पासपोर्टचे विघ्नही पालकमंत्र्यांनी केले होते दूर :

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सलग चौथ्या वर्षी २६ विद्यार्थी (१४ मुली व १२ मुले) आणि अधिकारी १२ नोव्हेंबर रोजी रात्री १०.३० च्या विमानाने अमेरिकेला रवाना झाले होते. मात्र, प्रवासाच्या दिवशी सकाळीच अल्पवयीन मुलांच्या पासपोर्ट वितरणाबाबत तांत्रिक नियमांमुळे मोठा पेच निर्माण झाला होता. पालक प्रत्यक्ष हजर नसल्याने २३ विद्यार्थ्यांचे पासपोर्ट अडकले होते आणि संपूर्ण दौरा धोक्यात येण्याची भीती निर्माण झाली होती.
त्यावेळी पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी क्षणाचाही विलंब न लावता ‘व्हीएफएस ग्लोबल’ (VFS Global) कार्यालयाशी संपर्क साधून अमेरिकन दूतावासाकडून (US Embassy) विशेष परवानगी मिळवून दिली होती. त्यांच्या या ‘क्विक ॲक्शन’मुळे अवघ्या काही तासांत सर्व पासपोर्ट मिळून विद्यार्थ्यांचे अमेरिका प्रवासासाठी यशस्वी उड्डाण झाले होते. आता त्याच दौऱ्यात विद्यार्थ्यांना सॅटेलाईट लाँचचा ऐतिहासिक अनुभव घेता आल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.