पालकमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेचा सामाजिक उपक्रम; युवासेना जिल्हाप्रमुख तुषार साळवी यांची प्रमुख उपस्थिती
रत्नागिरी: दिवाळी सणाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण उर्फ भैया सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना व युवासेनेच्या वतीने रत्नागिरीतील ‘वेदांती जिल्हा व्यसनमुक्ती केंद्र’ येथे दिवाळी फराळ वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. केंद्रातील रुग्ण आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीचा आनंद घेता यावा, या सामाजिक भावनेतून या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
रुग्णांशी संवाद साधत दिले निरोगी व आनंदी जीवनाचे बळ
या कार्यक्रमात युवासेनेचे जिल्हाप्रमुख तुषार साळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत तालुकाप्रमुख हर्षराज पाटील, झाडगाव व शिरगाव जिल्हा परिषद गटाचे विभाग समन्वयक वैभव कांबळे, युवा उद्योजक अमेय शिवलकर तसेच युवासेनेचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना संस्थेच्या स्नेहल खवळे आणि मयुरेश जाधव यांनी केली, तर संस्थेची संपूर्ण माहिती आणि कार्यपद्धती संचालक स्वप्निल कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांना समजावून सांगितली.
मान्यवरांच्या शुभहस्ते केंद्रातील सर्व रुग्णांना आणि कर्मचाऱ्यांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी रुग्णांशी आत्मीयतेने संवाद साधत त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. व्यसनमुक्ती केंद्रामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम कौतुकास्पद असून, व्यसनाधीन व्यक्तींना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची नितांत गरज असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

आपुलकी आणि सकारात्मकतेचे वातावरण
दिवाळीच्या निमित्ताने उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा आणि त्यांच्यामध्ये आपुलकी, सकारात्मकता व नवचैतन्य निर्माण करण्याचा हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. या कार्यक्रमाला संस्थेचे संचालक स्वप्निल कांबळे, प्रोजेक्ट को-ऑर्डिनेटर त्रिपाली कोळंबेकर, समुपदेशक रक्षंदा पाटोळे, मयुरेश जाधव, राहुल जाधव, स्नेहल खवळे, कुणाल शंभरकर आणि संस्थेत दाखल असलेले सर्व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते.













