यशवंतराव चव्हाण भवन येथे भावुक सोहळा; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या भावना
पुणे: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुणे जिल्हा परिषद परिसरातील यशवंतराव चव्हाण भवन येथे संपन्न झाले. या सोहळ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्या अपघाताचा अहवाल लवकरात लवकर समोर येण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना विनंती केल्याचे जाहीर केले. या प्रकरणात स्पष्टता येणे गरजेचे असून कोणीही दोषी आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे महत्त्वाचे विधान फडणवीस यांनी यावेळी केले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते.
ज्या जिल्हा परिषदेसाठी आयुष्य वेचले, तिथेच पुतळा हेच कर्तत्वाचे प्रमाणपत्र : सुनेत्रा पवार
या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार अजित पवारांच्या आठवणींनी अत्यंत भावुक झाल्या होत्या. "ज्या पुणे जिल्हा परिषदेसाठी अजितदादांनी आयुष्य वेचले, त्याच जिल्हा परिषदेत आज त्यांचा पुतळा बसवण्यात आला आहे, हेच त्यांच्या खऱ्या कर्तत्वाचे प्रमाणपत्र आहे," असे त्यांनी सांगितले. छत्रपती कारखाना, जिल्हा परिषद, खासदार आणि आमदार या प्रवासात दादांचे मातीशी असलेले नाते कधीही बदलले नाही, तसेच शेतकरी, सहकार आणि शिक्षणाच्या प्रश्नांवर त्यांनी केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला, अशा शब्दांत सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला.
‘फणस काटेरी पण आतून मधाळ असेच अजितदादा होते’ : एकनाथ शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांच्या कार्यशैलीचे कौतुक करत, "अजितदादा हे एका पुतळ्याच्या चौकटीत बसणारे व्यक्तिमत्त्व नाही, त्यांचे कार्य डोंगराएवढे मोठे आहे," अशा भावना व्यक्त केल्या. अजित पवारांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेताना त्यांनी काही महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या:

राजकीय प्रवास: सात वेळा आमदार, खासदार, सहा वेळा उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते म्हणून जबाबदारी.
अर्थसंकल्प आणि कामाची पद्धत: राज्याचा अर्थसंकल्प ११ वेळा मांडण्याचा विक्रम आणि प्रत्येक विकासकामाच्या दर्जावर बारीक लक्ष.
२८ जानेवारी रोजी झालेली ती दुर्घटना महाराष्ट्रासाठी काळा दिवस होता, असे सांगत "फणस वरून काटेरी असतो पण आतून मधाळ असतो, असेच अजितदादा होते," अशा शब्दांत एकनाथ शिंदे यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
कणखर, शिस्तबद्ध आणि थेट बोलणारा नेता गमावला : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात अजित पवारांचे पुण्यावरील प्रेम आणि त्यांची प्रशासकीय पकड यावर भाष्य केले. "अजितदादा एक कणखर, शिस्तबद्ध आणि दूरदृष्टी असलेले नेते होते. त्यांनी अनेक अर्थसंकल्प मांडले पण आर्थिक शिस्त कधीही मोडू दिली नाही. राजकारणात कोणीही थेट बोलत नाही, मात्र दादांकडे ‘हो’ आणि ‘नाही’ असे दोनच शब्द होते. जे पटले त्याला ‘हो’ म्हणायचे आणि ते काम पूर्णत्वास न्यायचे, तर जे पटले नाही त्याला स्पष्टपणे ‘नाही’ म्हणण्याची हिम्मत असलेले ते एकमेव नेते होते," असे गौरवोद्गार फडणवीस यांनी काढले.













