दुर्घटनेनंतर प्रशासनाकडून पावले; देवस्थानात स्टीलडोम बसवण्यासह संरक्षक उपाययोजनांवर भर
देवरुख: रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या श्रीक्षेत्र मार्लेश्वर येथील डोंगर माळावरून लहान-मोठे दगड कोसळून दुर्घटना होऊ नये, यासाठी आता प्रशासनाने कंबर कसली आहे. वाहनतळ ते मंदिर आणि मंदिर ते धबधब्यापर्यंत जाळीचे कुंपण करण्याचे नियोजन केले जात असून, जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांनी यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची महत्त्वाची बैठक घेतली आहे.
मुलीच्या मृत्यूनंतर प्रशासनाची गंभीर दखल
मार्लेश्वर येथील डोंगर माळावरून मोठे दगड पडण्याच्या घटना यापूर्वीही घडत असत. दरम्यान, गेल्या शुक्रवारी असाच एक दगड पडून एका लहान मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी दुर्घटना घडली होती. या घटनेनंतर वातावरण तापल्याने देवस्थान ट्रस्टने सुरक्षेसाठी तातडीने सुरक्षक नेमले होते, तर चिमुकलीचा जीव जाण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कारवाईची मागणीही जोर धरू लागली होती. या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची बैठक घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
वाहनतळापासून धबधब्यापर्यंत ७०० मीटर परिसरात कुंपण
देवरुख सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या प्रस्तावानुसार, डोंगराच्या ठिकाणी वाहनतळ ते मंदिरापर्यंत ५०० मीटर आणि मंदिरपासून धबधब्यापर्यंत २०० मीटर अशा एकूण ७०० मीटरच्या परिसरात जाळीचे कुंपण (फॅन्सिंग) घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच याकामाची प्रत्यक्ष पूर्तता केली जाणार आहे. याशिवाय, ज्या गुहेत देवाचे मंदिर आहे त्या गुहेच्या छताचे दगडही निसरत असल्याने, त्या ठिकाणी छताला ‘स्टीलडोम’ लावण्याचा विचारही केला जात आहे.

श्री क्षेत्र मार्लेश्वर हे सह्याद्रीच्या कुशीत वसलेले असल्याने येथे वर्षभर लाखो भाविकांची रेलचेल सुरू असते. पर्यटकांना सुरक्षित व मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या उपाययोजना अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जात असून, लवकरच यावर अंमलबजावणी होणार आहे.













