अप्पर जिल्हा दंडाधिकाऱ्यांचे आदेश; विविध सण, आंदोलने आणि संभाव्य तणावाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रतिबंधक उपाययोजना
*रत्नागिरी: *रत्नागिरी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी १५ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १ वाजेपासून ते २९ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात प्रतिबंधक मनाई आदेश लागू करण्यात आले आहेत. अपर जिल्हा दंडाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व (३) (१९५१ चा कायदा २२ वा) अन्वये हे आदेश जारी केले आहेत. आगामी काळातील सण-उत्सव, विविध विकास प्रकल्पांसंदर्भातील आंदोलने आणि संभाव्य तणाव लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
आगामी काळात जिल्ह्यात २० नोव्हेंबर रोजी प्रबोधिनी स्मार्ट एकादशी, २१ नोव्हेंबर रोजी भागवत एकादशी व २४ नोव्हेंबर रोजी गुरुनानक जयंती हे सण साजरे करण्यात येणार आहेत. यासोबतच दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे जिल्ह्यातील पर्यटन स्थळे व समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. दुसरीकडे, जिल्ह्यातील खेड, चिपळूण, अलोरे-शिरगाव, रत्नागिरी, जयगड व देवरुख या औद्योगिक पट्ट्यात (विशेषतः अलोरे-शिरगाव हद्दीतील साफीस्ट कंपनी, खेडमधील कोकाकोला कंपनी व जयगडमधील प्रस्तावित वाटद-खंडाळा एमआयडीसी प्रकल्पसंदर्भात) स्थानिकांकडून विविध मागण्यांसाठी अचानक संप व आंदोलने पुकारली जात आहेत. तसेच मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चे काम पूर्ण न झाल्यानिषेधार्थ विविध राजकीय पक्ष आणि संघटनांकडून आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील मिश्रवस्तीच्या गावांमध्ये वैयक्तिक कारणांवरून जातीय तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता शांतता भंग होऊ नये, यासाठी प्रशासनाने हा प्रतिबंधक निर्णय घेतला आहे. या कालावधीत नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.














