ठाकरे युवासेनेच्या आंदोलनाला यश; कोकण रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत पत्र जारी
रत्नागिरी: रत्नागिरी रेल्वे स्थानकावरील पे अँड पार्किंगच्या मनमानी वसुलीविरोधात युवासेनेने पुकारलेल्या आंदोलनाला अखेर मोठे यश आले आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने ठाकरे युवासेनेला अधिकृत पत्र देऊन स्थानक परिसरात मोफत ‘ड्रॉप अँड गो’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची घोषणा केली आहे. या कालावधीत प्रवाशांकडून कोणतेही पार्किंग शुल्क आकारले जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड, रत्नागिरीचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक शैलेश दा. बापट यांनी ठाकरे युवासेनेच्या पत्राची गंभीर दखल घेत माजी युवासेना जिल्हाधिकारी प्रसाद सावंत यांना हे पत्र दिले आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसर आता मोफत ‘ड्रॉप अँड गो’ सुविधेमुळे सुकर झाला असून, यादरम्यान येणाऱ्या वाहनांकडून शुल्क आकारले जाणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.
ठेकेदाराच्या मनमानी वसुलीवर कडक नियंत्रण यापूर्वी पार्किंग ठेकेदाराकडून प्रवाशांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने संबंधित पार्किंग ठेकेदारास निर्धारित दरापेक्षा जास्त शुल्क अजिबात आकारू नये व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सक्त सूचना दिल्या आहेत. तसेच, रेल्वे प्रशासनाने निश्चित केलेले शुल्कदर्शक फलक लावणे पार्किंग ठेकेदाराला बंधनकारक करण्यात आले असून, त्याच दरानुसार शुल्क आकारावे लागणार आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास तातडीने कारवाई केली जाईल, असा इशाराही कोकण रेल्वेने दिला आहे.

रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या हितासाठी योग्य ती कार्यवाही करण्यास कटिबद्ध असून, युवासेनेने उपस्थित केलेल्या मागण्यांच्या अनुषंगाने योग्य निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता संबंधित जनआंदोलन मागे घ्यावे, अशी विनंतीही कोकण रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.













