भडवळकरवाडीतील कठडा नसलेल्या विहिरीत पडलेल्या एक वर्षीय मादी काळ्या बिबट्याची सुखरूप सुटका; वैद्यकीय तपासणीनंतर नैसर्गिक अधिवासात मुक्त
*चिपळूण: *रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील उमरोली येथील भडवळकरवाडीमध्ये ४० फूट खोल विहिरीत पडलेल्या दुर्मीळ काळ्या बिबट्याची वन विभागाच्या बचाव पथकाने मंगळवारी (दि. १७) सकाळी सुखरूप सुटका केली. सुमारे एक वर्ष वयाच्या या मादी काळ्या बिबट्याला कोणतीही इजा न होऊ देता विहिरीबाहेर काढण्यात वन विभागाला मोठे यश आले असून, वैद्यकीय तपासणीनंतर त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले आहे.
उमरोली येथील भडवळकरवाडीतील विष्णू अर्जुन भडवळकर यांच्या मालकीच्या विहिरीत हा काळा बिबट्या पडल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत ग्रामपंचायत सदस्य योगेश खांडेकर यांनी तात्काळ वनरक्षक राहुल गुंठे यांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाचे अधिकारी आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संबंधित विहीर लोकवस्तीपासून सुमारे ४०० ते ५०० मीटर अंतरावर शेतात असून, तिला कठडा किंवा कोणतेही संरक्षक बांधकाम नव्हते.
दगडाच्या आधारावर अडकलेल्या बिबट्याला पिंजऱ्यात घेतले
सुमारे ४० फूट खोल असलेल्या या विहिरीत पाणी असल्याने बिबट्याने विहिरीतील एका दगडावर आश्रय घेतला होता. बचाव पथकाने अत्यंत सावधगिरी बाळगत विहिरीत पिंजरा सोडला. पिंजरा खाली उतरताच बिबट्याने त्यावर उडी मारली; मात्र बचाव पथकाने कौशल्याने पिंजऱ्याची हालचाल नियंत्रित करत बिबट्याला सुरक्षितपणे पिंजऱ्यात जेरबंद केले आणि सुखरूप वर काढले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम फत्ते
ही संपूर्ण बचाव मोहीम मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी, विभागीय वनाधिकारी गिरिजा देसाई आणि सहायक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष बचावकार्यात वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. खान यांच्यासह वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक कृष्णा इरमले, वनरक्षक राहुल गुंठे, बचाव पथकातील अजय बडदे, अथर्व घाग, वाहनचालक नंदकुमार कदम आणि लिपिक शहेनशहा कलावंत यांनी सक्रिय सहभाग घेत ही मोहीम यशस्वी केली.













