खेळत असताना कुत्र्याने घेतला जोरदार चावा; जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त
रत्नागिरी: रत्नागिरी शहरातील कीर्तीनगर परिसरात भटक्या कुत्र्याने एका सहा वर्षीय बालkaवर अचानक हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली. हैदर असीम अन्सारी (वय ६ वर्षे, रा. कीर्तीनगर, रत्नागिरी) असे या जखमी बालकाचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण कीर्तीनगर परिसरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
मंगळवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सहा वर्षीय हैदर अन्सारी हा आपल्या कीर्तीनगर परिसराजवळ खेळत असताना, अचानक तिथे आलेल्या एका आक्रमक भटक्या कुत्र्याने त्याच्यावर झडप घातली आणि जोरदार चावा घेतला. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे हैदर प्रचंड घाबरून ओरडू लागला. त्याचा आर्त आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कुत्र्याला हुसकावून लावत हैदरची सुटका केली.
रुग्णालयात उपचार सुरू; नगर प्रशासनाविरोधात रोष
या हल्ल्यात हैदरच्या शरीरावर गंभीर जखमा झाल्या आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून त्याच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिक नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता त्याला तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल केले. सध्या रुग्णालयातील वैद्यकीय पथकाकडून हैदरवर आवश्यक ती वैद्यकीयोपचार प्रक्रिया व अँटी-रेबीज लसीकरण सुरू आहे.

गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी शहरातील कीर्तीनगर तसेच आसपासच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावरून चालणेही दुिस्तर झाले असून यापूर्वीही अशा लहान-मोठ्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नगर परिषदेने या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी आता कीर्तीनगरमधील संतप्त रहिवाशांकडून केली जात आहे.













