Lanja Nws: लांजा उड्डाणपुलावर दोन कारची समोरासमोर जोरदार धडक; रत्नागिरीतील दोघे जखमी, स्कॉर्पिओमधील पाच प्रवासी सुखरूप

Lanja Nws: लांजा उड्डाणपुलावर दोन कारची समोरासमोर जोरदार धडक; रत्नागिरीतील दोघे जखमी, स्कॉर्पिओमधील पाच प्रवासी सुखरूप

राजापूरहून रत्नागिरीकडे परतणाऱ्या टाटा अल्ट्रोजला राजस्थानहून कारवारला जाणाऱ्या स्कॉर्पिओची धडक; दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान

लांजा: रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील उड्डाणपुलावर टाटा अल्ट्रोज आणि स्कॉर्पिओ या दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात घडला. मंगळवारी (दि. १७ नोव्हेंबर २०२६) झालेल्या या दुर्घटनेत अल्ट्रोज कारमधील दोन प्रवासी जखमी झाले असून, दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने, स्कॉर्पिओ कारमधील तीन लहान मुलांसह पाचही प्रवासी या अपघातातून सुखरूप बचावले आहेत.

रत्नागिरीतील नाचणे श्रीरामनगर येथील गुरव कुटुंबीय आपल्या टाटा अल्ट्रोज कारने (क्रमांक एमएच ०८ बीई १०६७) राजापूर तालुक्यातील खांबवाडी येथे एका बाराव्याच्या कार्यक्रमासाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून ते रत्नागिरीकडे परतत असताना लांजा उड्डाणपुलावर हा अपघात झाला. ही कार प्रसाद रघुनाथ गुरव (वय ३२, रा. नाचणे श्रीरामनगर, रत्नागिरी) हे चालवत होते. त्यांच्यासोबत कारमध्ये रेखा रघुनाथ गुरव (वय ५५), शितल रघुनाथ गुरव (वय २७, दोघे रा. नाचणे श्रीरामनगर, रत्नागिरी) तसेच मिरजोळे येथील सुजाता हरेंद्र गुरव (वय ५५) आणि हरेंद्र महादेव गुरव (वय ५९) असे पाच जण प्रवास करत होते. या भीषण धडकेत कारमधील दोघे जण जखमी झाले आहेत.

राजस्थानहून कारवारला निघालेल्या देवासी कुटुंबीयांचा अपघात
अपघातग्रस्त दुसरी स्कॉर्पिओ कार (क्रमांक जीजे ०२ डीपी ९९५९) राजस्थानहून कारवारच्या दिशेने प्रवास करत होती. राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील भिनमाल तालुक्यातील बडकरा येथील कृष्णकुमार हिराराम देवासी (वय २६) हे आपली पत्नी चंपादेवी कृष्णकुमार देवासी (वय २३), मुलगी लक्षीता (वय ५ वर्षे) आणि दोन मुले माहिर (वय २.५ वर्षे) व प्रिन्स (वय १.५ वर्षे) यांच्यासह १५ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता राजस्थानहून प्रवासासाठी निघाले होते.

Yash siddhi2

प्रवासादरम्यान अहमदाबाद आणि मुंबई येथे रात्रीचा मुक्काम करून ते १७ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता कारवारच्या दिशेने रवाना झाले होते. मात्र, लांजा उड्डाणपुलावर दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातानंतर याप्रकरणी लांजा पोलिसांकडून घटनास्थळाची पाहणी करून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.