रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी धडक कारवाई! हातखंबा येथे तब्बल १ कोटी ७५ लाख ९४ हजारांचा गोवा बनावटीचा दारूसाठा आणि ट्रक जप्त

रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी धडक कारवाई! हातखंबा येथे तब्बल १ कोटी ७५ लाख ९४ हजारांचा गोवा बनावटीचा दारूसाठा आणि ट्रक जप्त

मुंबई-गोवा महामार्गावर सापळा रचून ‘रॉयल ब्लू व्हिस्की’चे १,४०० बॉक्स पकडले; सातारा येथील ट्रकचालकाला अटक, अवैध दारूची माहिती देण्याचे विभागाचे आवाहन

रत्नागिरी :
रत्नागिरी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर मोठी धडक कारवाई करत परराज्यातील (गोवा राज्य निर्मित) अवैध मद्याची वाहतूक करणाऱ्या सहाचाकी ट्रकवर छापा टाकला आहे. गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी हातखंबा येथे केलेल्या या कारवाईत तब्बल १ कोटी ४७ लाख ८४ हजार रुपये किमतीची गोवा बनावटीची दारू आणि ट्रक असा एकूण १ कोटी ७५ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, सातारा येथील वाहनचालकाला अटक करण्यात आली आहे.

हातखंबा येथे हॉटेल सदानंदसमोर रचला सापळा :
मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील मौजे हातखंबा (ता. जि. रत्नागिरी) येथील हॉटेल सदानंदसमोरून गोवा ते मुंबई दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचला होता. यावेळी संशयास्पदरीत्या जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या सहाचाकी अशोक लेलंड ट्रकची (रजि. क्र. एमएच ११ डीव्ही ७९१४) तपासणी केली असता, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला आणि केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेला मद्याचा मोठा साठा आढळून आला.

१ कोटी ७५ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त; सातारा येथील चालक अटकेत :
या कारवाईत पथकाने ‘रॉयल ब्लू व्हिस्की’ या ब्रँडचे एकूण १,४०० कागदी पुठ्ठ्याचे बॉक्स (१२,०९६ बल्क लिटर, किंमत रु. १,४७,८४,०००/-) आणि गुन्ह्यात वापरलेला सहाचाकी अशोक लेलंड ट्रक असा सर्व मिळून एकूण १,७५,९४,००० रुपये (एक कोटी पंचाहत्तर लाख चौऱ्याण्णव हजार रुपये मात्र) किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वाहनचालक आरोपी सचिन भीमराव सपकाळ (रा. मु. पो. शिवघर, बौद्धवस्ती, ता. जि. सातारा) याला ताब्यात घेण्यात आले असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक ३६७/२०२६ नुसार महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ (अ, ई), ८१, ८३ आणि ९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

#concepts\'

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाची कामगिरी :
ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, अंमलबजावणी व दक्षता संचालक श्री. प्रसाद सुर्वे, कोल्हापूर विभागाच्या विभागीय उपायुक्त श्रीमती स्नेहलता नरवणे आणि रत्नागिरीच्या अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या पथकात भरारी पथकाचे निरीक्षक श्री. ए. ए. (अमित) पाडळकर, दुय्यम निरीक्षक श्री. पी. ए. गुरव, जवान श्री. मानस पवार, जवान नि वाहनचालक श्री. अतुल वसावे, जवान श्री. अनुराग बर्वे, जवान नि वाहनचालक श्री. विशाल विचारे, जवान श्री. विशाल भोसले, जवान श्री. निलेश तुपे आणि जवान श्री. सागर टिकार यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक अमित पाडळकर हे करत आहेत.

अवैध मद्यविक्री व वाहतुकीची माहिती देण्याचे आवाहन :
जिल्ह्यात कोठेही हातभट्टी दारूची निर्मिती, विक्री, परराज्यातील अवैध मद्याची वाहतूक व साठा किंवा बनावट माडी विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या व्हॉट्सॲप क्रमांक ८४२२००११३३ किंवा टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ वर संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरीच्या अधीक्षक श्रीमती किर्ती शेडगे यांनी केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येईल, असेही विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.