Cyclone Akwan Landfall ची प्रक्रिया पुढील तीन तास सुरू राहणार; आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीवर अतिवृष्टी व पूरस्थितीचा इशारा
Cyclone Akwan Landfall ची प्रक्रिया आज सकाळी ७:३० ते ८:३० दरम्यान उत्तर आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीवर गोपाळपूरजवळ सुरू झाली आहे. किनारपट्टी ओलांडताना वाऱ्याचा वेग ताशी ७० ते ८० किलोमीटर इतका असून, वाऱ्याचे झोत ताशी ९० किलोमीटरपर्यंत पोहोचले आहेत, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने (IMD) दिली आहे.
चक्रीवादळाची किनारपट्टीवर धडकण्याची प्रक्रिया पुढील तीन तास सुरू राहणार असून, या वादळाचे केंद्र गोपाळपूर येथे आहे. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे किनारपट्टी भागात जोरदार वाऱ्यांसह हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रभावित भागातील प्रशासन आणि नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना हवामान विभाग आणि स्थानिक प्रशासनाने दिल्या आहेत.
Cyclone Akwan Landfall मुळे अतिवृष्टी आणि अचानक पुराचा धोका
हवामान विभागाने ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीवर अतिवृष्टी होण्याचा इशारा दिला आहे. या काळात समुद्रात ०.५ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशच्या विजयनगरम आणि श्रीकाकुलम तसेच ओडिशाच्या गंजाम आणि पुरी जिल्ह्यातील सखल भागांत पाणी साचण्याचा धोका निर्माण झाला आहे.

याशिवाय, पुढील २४ तासांत ओडिशा, आंध्र प्रदेशची किनारपट्टी, पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या काही परिसरांत अचानक पूर येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. विशाखापट्टणम येथील समुद्रातही उंच लाटा उसळत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मच्छिमारांसह इतरांना समुद्रात न जाण्याचे आवाहन करण्यात आले असून, पर्यटकांनाही या भागात फिरकण्यास बंदी घालण्यात आली आहे.
प्रशासनाकडून हजारो नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर
दक्षिण विभागाचे महसूल विभागीय आयुक्त विजय अमृता कुलांगे यांनी वृत्तसंस्था एएनआयला या परिस्थितीबाबत सविस्तर माहिती दिली. प्रशासनाने गजपती जिल्ह्यात २२ हजारांहून अधिक आणि कंधमाळ जिल्ह्यात १३ हजारांहून अधिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
कोणत्याही व्यक्तीचा किंवा प्राण्याचा मृत्यू होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून विशेष नियोजन करून विविध पथके तैनात करण्यात आली आहेत. डोंगराळ भाग, घसरणीचे क्षेत्र आणि भूस्खलन होणाऱ्या परिसरांकडे विशेष लक्ष दिले जात असून, तेथील सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. तसेच, कुणाचीही आरोग्याची समस्या उद्भवल्यास तात्काळ उपचार देण्याची व्यवस्था करण्यात आली असून, वाहतूक व्यवस्थेवरही प्रशासन लक्ष ठेवून असल्याचे कुलांगे यांनी स्पष्ट केले.













