सडलेल्या मृतदेहाच्या कवटीवरून चेहरा पुनर्रचित करून पटविली ओळख; जन्मदात्या वडिलांसह सख्ख्या भावानेच केला होता खून, दोघेही गजाआड
रत्नागिरी : रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे (भा.पो.से.) यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित ‘RAIDS App’ च्या माध्यमातून रत्नागिरी पोलीस दलाने परभणी जिल्ह्यातील एका गंभीर आणि क्लिष्ट खून प्रकरणाच्या तपासाला निर्णायक दिशा देत मोठे यश मिळवले आहे. पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेतील एका अनोळखी मृतदेहाच्या कवटीवरून एआय (AI) तंत्रज्ञानाद्वारे चेहरा पुनर्रचित (Face Reconstruction) करून मृताची ओळख पटवण्यात आली. या तांत्रिक तपासामुळेच या खून प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात परभणी पोलिसांना यश आले आहे.
जायकवाडी धरणाच्या कालव्यात सापडला होता अनोळखी मृतदेह :
दिनांक ०९ मे २०२६ रोजी परभणी जिल्ह्यातील दैठणा पोलीस ठाणे हद्दीतील जायकवाडी धरणाच्या कालव्याच्या पाण्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९०/२०२६ अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, सदर मृतदेहाचा चेहरा अत्यंत कुजलेल्या अवस्थेत असल्याने मृत व्यक्तीची ओळख पटविणे अशक्य झाले होते. त्यामुळे या गुन्ह्याचा छडा लावणे परभणी पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.

कवटीवरून चेहरा पुनर्रचित करत रत्नागिरी पोलिसांनी दिले अचूक मार्गदर्शन :
या गंभीर गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी पोलीस दलाच्या एआय आधारित ‘RAIDS App’ चा वापर करण्यात आला. या ॲपच्या माध्यमातून अनोळखी मृतदेहाच्या कवटीच्या रचनेच्या आधारे अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाचा वापर करून चेहऱ्याची प्रतिमा (Face Reconstruction) पुनर्रचित करण्यात आली. तसेच, हे पुनर्रचित छायाचित्र विविध ठिकाणी प्रसारित करून पोलीस पाटील यांच्या माध्यमातून माहिती संकलित करण्याबाबत रत्नागिरी पोलिसांनी परभणी जिल्हा पोलीस दलास मोलाचे मार्गदर्शन केले.
वडिलांनी आणि भावानेच केली होती हत्या; दोघेही पोलीस कोठडीत :
रत्नागिरी पोलिसांच्या या तांत्रिक प्रक्रियेमुळे आणि अचूक मार्गदर्शनामुळे अखेर त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले. मयत व्यक्तीचे नाव गिताराम प्रकाश मुजमुले (रा. देवनांद्रा, ता. पाथरी, जि. परभणी) असल्याचे निष्पन्न झाले. ओळख पटल्यानंतर परभणी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली असता, या खून प्रकरणी मयत गिताराम याचे वडील प्रकाश सखाराम मुजमुले आणि सख्खा भाऊ कृष्णा प्रकाश मुजमुले यांचा सहभाग समोर आला. परभणी पोलीस दलाने या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. रत्नागिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या ‘RAIDS App’ मुळे आंतरजिल्हा तपासात मोठी मदत झाल्याने सर्वत्र कौतुक होत आहे.













