दापोलीत अज्ञात समाजकंटकाचा संतापजनक प्रकार! कुंभवे येथील ८ एकर काजूच्या बागेला आग लावल्याने तब्बल १५ लाखांचे नुकसान!

दापोलीत अज्ञात समाजकंटकाचा संतापजनक प्रकार! कुंभवे येथील ८ एकर काजूच्या बागेला आग लावल्याने तब्बल १५ लाखांचे नुकसान!

१५ वर्षांपूर्वी लागवड केलेली ७२० काजूची झाडे आणि पीव्हीसी पाईपलाईन जळून खाक; दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

दापोली (रत्नागिरी) :
दापोली तालुक्यातील कुंभवे येथील सुमारे ८ एकर काजूच्या बागेतील वाळलेल्या गवतास अज्ञात व्यक्तीने आग लावल्याने बागेतील ७२० काजूची झाडे व पीव्हीसी पाईपलाईन जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या आगीत बागायतदाराचे सुमारे १५ लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१५ वर्षांपूर्वीची ७२० काजूची झाडे आणि पाईपलाईन आगीत होरपळली :
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हेमंत नामदेवराव नगराळे यांच्या मालकीची कुंभवे (ता. दापोली) येथे सुमारे ८ एकर काजूची बाग आहे. दिनांक १२ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी १०.१५ वाजल्यापासून ते दिनांक १८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ८.०० वाजेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने या बागेतील वाळलेल्या गवतास आग लावली. ही आग संपूर्ण बागेत पसरल्याने बागेत १५ वर्षांपूर्वी लागवड केलेली सुमारे ७२० काजूची झाडे आणि झाडांना पाणी देण्यासाठी केलेली पीव्हीसी पाईपलाईन पूर्णतः होरपळून नष्ट झाली. या आगीत सुमारे १० लाख रुपये किमतीची ७२० काजूची झाडे आणि ५ लाख रुपये किमतीची पीव्हीसी पाईपलाईन असे एकूण १५,००,००० रुपयांचे नुकसान झाले आहे.

दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद :
या घटनेप्रकरणी बागेत काम करणारे फिर्यादी दयानंद गोविंद (वय ५२ वर्षे, व्यवसाय- मजुरी, मूळ रा. लिपणीवावे, ता. म्हसळा, जि. रायगड; सध्या रा. साखळोली, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांनी गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ९.५५ वाजता दापोली पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून दापोली पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक २५३/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३२६(f) अन्वये आगळीक करून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Yash siddhi