देवरूखमध्ये जुन्या वादातून तरुणावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला; लाकडी दांडका व ॲल्युमिनियमच्या वस्तूने मारहाण करत उजवा हात केला फ्रॅक्चर!

देवरूखमध्ये जुन्या वादातून तरुणावर टोळक्याचा जीवघेणा हल्ला; लाकडी दांडका व ॲल्युमिनियमच्या वस्तूने मारहाण करत उजवा हात केला फ्रॅक्चर!

तेलीवाडी येथील गणपती विसर्जन घाटाजवळ भरदुपारी घडला प्रकार; दोघा महिलांसह पाच जणांविरुद्ध देवरूख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

देवरूख (रत्नागिरी) :
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख येथील तेलीवाडी परिसरात मागील तक्रारीचा व जुन्या वादाचा राग मनात धरून दुचाकीवरून घरी जाणाऱ्या एका ३७ वर्षीय तरुणाला अडवून पाच जणांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. लाकडी दांडका, काठी आणि ॲल्युमिनियमच्या वस्तूने केलेल्या या हल्ल्यात तरुणाच्या उजव्या हाताला फ्रॅक्चर होऊन गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी देवरूख पोलीस ठाण्यात दोघा महिलांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी अडवून लाकडी दांडक्याने आणि काठीने बेदम मारहाण :
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहित हरिश्चंद्र किर्वे (वय ३७ वर्षे, व्यवसाय- चालक, रा. देवरूख तेलीवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) हे गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी १.०० वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून घरी जात होते. नटेवाडी हरपुडे ते तेलीवाडी जाणाऱ्या रोडवर गणपती विसर्जन घाटाच्या पुढील बाजूच्या गल्लीमध्ये आले असता, मागील तक्रारीचा व वादाचा राग मनात धरून समिक्षा सतिष किर्वे आणि सुगंधा सुरेश किर्वे यांनी त्यांना वाटेत थांबवले आणि लाकडी दांडक्याने त्यांच्या पाठीवर व मानेवर मारहाण केली.

जमिनीवर पाडून छातीवर लाथ मारल्याने हात फ्रॅक्चर :
त्यानंतर लगेचच सतिष सुरेश किर्वे, राजेंद्र सुरेश किर्वे आणि महेश सुरेश किर्वे (सर्व रा. तेलीवाडी देवरूख, ता. संगमेश्वर) हे तिघेजण त्या ठिकाणी आले. या तिघांनीही लाकडी काठी व ॲल्युमिनियमच्या वस्तूने रोहित किर्वे यांच्या कमरेवर, उजव्या व डाव्या हातावर आणि पाठीवर जोरदार मारहाण करून त्यांना जमिनीवर खाली पाडले आणि छातीवर लाथ मारून जखमी केले. या गंभीर मारहाणीत रोहित किर्वे यांच्या उजव्या हाताला जबर मार लागून हात फ्रॅक्चर झाला आहे.

Arihant 4

देवरूख पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद :
या मारहाण प्रकरणी जखमी फिर्यादी रोहित हरिश्चंद्र किर्वे यांनी गुरुवार, दिनांक १९ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८.०९ वाजता देवरूख पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून देवरूख पोलिसांनी समिक्षा सतिष किर्वे, सुगंधा सुरेश किर्वे, सतिष सुरेश किर्वे, राजेंद्र सुरेश किर्वे आणि महेश सुरेश किर्वे या पाचही जणांविरुद्ध गुन्हा रजिस्टर क्रमांक १७५/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ११७(२), १८९, १९०, १९१ आणि ३५१ अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.