गोवळकोट, पेठमाप आणि उक्ताड परिसरात नवीन वितरण वाहिनी व पाणीपुरवठा पुनर्नियोजनाचे आश्वासन
Chiplun Water Issue संदर्भात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण नगरपरिषद हद्दीतील गोवळकोट, गोवळकोट रोड, पेठमाप आणि उक्ताड परिसरातील नागरिकांना गेल्या काही काळापासून खारे, मचूळ आणि अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर समस्येविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला २५ नोव्हेंबरपर्यंतची अंतिम मुदत दिली असून, या मुदतीत पाणीप्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर १७ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणारे उपोषण काँग्रेसच्या नगरसेवकांनी तात्पुरते स्थगित केले आहे.
या पाणीप्रश्नाबाबत काँग्रेस पक्षाच्या नगरपरिषदेतील गटनेत्यांसह नगरसेवकांनी नगरपरिषदेच्या सभागृहात सातत्याने आवाज उठवला होता. नागरिकांना नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा व्हावा, यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करण्यात आला, मात्र समस्येवर ठोस तोडगा न निघाल्याने अखेर १७ नोव्हेंबरपासून उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
Chiplun Water Issue सोडवण्यासाठी प्रशासनाच्या लेखी उपाययोजना
दरम्यान, नगरपरिषद प्रशासनाने १८ नोव्हेंबर रोजी लेखी स्वरूपात उपाययोजनांची माहिती दिली. यामध्ये पेठमाप परिसरात नवीन वितरण वाहिनी टाकणे, उक्ताड परिसरातील पाणीपुरवठ्याचे पुनर्नियोजन करणे, गोवळकोट परिसरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारणे आणि आवश्यक दाबाने पाणीपुरवठा होण्यासाठी उपाययोजना करणे आदी बाबींचा समावेश आहे.

तसेच नगराध्यक्ष आणि संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन २५ नोव्हेंबरपर्यंत चारही परिसरांतील पाण्याचा प्रश्न मार्गी लावून नियमित व शुद्ध पाणीपुरवठा सुरू करण्याचे ठोस आश्वासन दिले. प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाचा आणि लोकशाही मार्गाने केलेल्या मागणीला मिळालेल्या प्रतिसादाचा विचार करून काँग्रेसच्या नगरसेवकांनी सध्या उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रांताधिकारी व प्रशासनाला निवेदन सादर; शिष्टमंडळाची उपस्थिती
काँग्रेसच्या रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्षा सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, मुख्याधिकारी संजय जाधव यांच्यासह पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले.
या वेळी काँग्रेसचे जिल्हा समन्वयक सुरेश कातकर, महिला चिपळूण तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, गटनेते साजिद सरगुरोह, नगरसेविका सफा गोठे, मिस्बाह नाखुदा, माजी नगरसेवक सुरेश राऊत, चिपळूण शहराध्यक्ष कैसर देसाई, डॉ. सरफराज गोठे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.













