Harshvardhan Sapkal: अर्थखातं, अजित पवारांच्या अपघाताचा तपास आणि शेतकरी मदतीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका

Harshvardhan Sapkal: अर्थखातं, अजित पवारांच्या अपघाताचा तपास आणि शेतकरी मदतीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका

अजित पवार प्रकरणी सीबीआय चौकशी आणि शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदतीची मागणी; सरकारच्या धोरणांवर उपस्थित केले प्रश्न

Harshvardhan Sapkal यांनी अर्थखात्याचे वाटप, अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास आणि शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आर्थिक मदतीच्या मुद्द्यांवरून राज्य सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अर्थखाते मिळवण्याची धमक नाही की त्यांचे काहीतरी प्रकरण आहे, ज्यातून ब्लॅकमेल करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी अर्थखाते स्वतःकडे ठेवले आहे, याचा राष्ट्रवादी अजित पवार गटाने खुलासा करावा, असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले.

अजित पवार यांनी १०४ वेळा चार्टर विमानातून प्रवास केला होता, मात्र त्यांचा घातपात झाला की अपघात या मूळ मुद्द्यावर अद्याप कोणताही चौकशी अहवाल का समोर आला नाही, असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला. या प्रकरणात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सर्वच स्तरांतून सीबीआय चौकशीची मागणी झाली होती, त्याचे पुढे काय झाले हे कळले नसल्याचे सांगत काँग्रेसनेही या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. संबंधित कंपनीच्या मालकाचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध असल्याने एका व्यक्तीला वाचवण्यासाठी कारवाई होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

Harshvardhan Sapkal यांचा अजित पवार अपघात प्रकरणातील तपासावर आक्षेप
रोहित पवार यांनी अजित पवारांचा घातपात झाला की अपघात यासंदर्भात पुरावे सादर करून केलेली मागणी अत्यंत वस्तुनिष्ठ स्वरूपाची असल्याचे सपकाळ यांनी नमूद केले. त्यामुळे दिवसेंदिवस अजितदादांच्या अपघाताची शंका अधिक दाट होत चालली असून, घटनेला एक वर्ष पूर्ण होत आले तरी त्यांचा पक्ष शांत बसला असल्याची टीका त्यांनी केली. पाताळातूनही आरोपी शोधून आणू अशी घोषणा करणारे मुख्यमंत्री खोटे बोलत असून, या मृत्यू प्रकरणात काहीतरी लपाछपी केली जात असल्याचे सपकाळ म्हणाले.

Radhakrushna patapedhi

याचवेळी त्यांनी शिंदेसेनेवरही निशाणा साधला. बाळासाहेब ठाकरे यांचे बोट धरून पुढे आलेल्यांनीच त्यांचा फोटो काढला आणि शिवसेनेशी गद्दारी केली, तसेच सोनिया गांधी यांच्या व्यक्तिगत चरित्रावर बोलताना त्यांनी आपली मानसिक दिवाळखोरी दाखवून दिली, अशी टीका सपकाळ यांनी केली.

शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत आणि मजुरांसाठी कल्याणकारी योजनांची मागणी
शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या ५,००० रुपयांच्या मदतीवरून सपकाळ यांनी राज्य सरकारवर टीका करताना, सरकारने शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्याचे म्हटले. पाच हजार रुपयांची मदत देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यात आले असून, केंद्र व राज्य सरकारची मदत वगळता शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपये मदत द्यावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. या मागणीसाठी काँग्रेसने आंदोलनाची भूमिका घेतली असून, सरकारला मदत देण्यास भाग पाडू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांसोबतच भूमिहीन शेतमजुरांनाही मदत देण्याची गरज असून, त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना आणाव्यात, असे सपकाळ यांनी सुचवले. मजुरांचे स्थलांतर थांबवण्यासाठी त्यांना गावातच काम उपलब्ध करून द्यावे व गॅस सिलेंडर द्यावेत, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, इतर राज्यांतून चारा आणावा आणि दुष्काळाच्या अनुषंगाने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी करत सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याचे त्यांनी म्हटले.