Chiplun Development Works अंतर्गत चिपळूण-गुहागर बायपास, पिंपळी-नांदिवसे रस्ता आणि पेढांबे पुलाच्या कामांचा समावेश; आमदार शेखर निकम यांच्या हस्ते भूमिपूजन
चिपळूण: Chiplun Development Works अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामांना गती देण्यासाठी आमदार शेखर निकम यांच्या विशेष प्रयत्नांतून अर्थसंकल्पीय तरतुदीखाली मंजूर तीन महत्त्वाच्या कामांचा भूमिपूजन सोहळा सोमवारी पार पडला. या कामांसाठी एकूण ६ कोटी ८३ लाख रुपयांची अंदाजपत्रकीय तरतूद करण्यात आली असून, यामुळे चिपळूण तालुक्यातील रस्ते आणि पुलांच्या पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे.
मंजूर झालेली तीन प्रमुख विकासकामे आणि निधी या विकासकामांमध्ये चिपळूण-गुहागर बायपास रोडचे मजबुतीकरण व डांबरीकरण, पिंपळी-नांदिवसे रस्त्याची सुधारणा आणि पेढांबे येथील मोठ्या पुलाची पुनर्बांधणी यांचा समावेश आहे. सोमवारी सकाळी चिपळूण-गुहागर बायपास रोडच्या मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून, त्यासाठी १ कोटी ९१ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने वाहनांची वाहतूक होत असल्याने काम पूर्ण झाल्यानंतर वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पिंपळी-नांदिवसे रस्ता आणि पेढांबे पूल कामाचा शुभारंभ बायपास रोडच्या भूमिपूजनानंतर पिंपळी-नांदिवसे रस्ता सुधारणा व डांबरीकरण कामाचा भूमिपूजन समारंभ पार पडला. या कामासाठी ९२ लाख रुपये मंजूर झाले आहेत. त्यानंतर दुपारी पेढांबे येथील मोठ्या पुलाच्या पुनर्बांधणी कामाचे भूमिपूजन करण्यात आले असून, या कामासाठी तब्बल ४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आमदार शेखर निकम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय तरतुदीअंतर्गत या कामांना मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

मान्यवरांची उपस्थिती या भूमिपूजन कार्यक्रमास सभापती सूर्यकांत खेतले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, ज्येष्ठ नेते दादा साळवी, उपसभापती संदेश आयरे, भाजप गटनेते शशिकांत मोदी, नगरसेविका रसिका देवळेकर, अंजली कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष नितीन ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, आरोग्य समिती सभापती शुभम पिसे, भाजप चिपळूण शहराध्यक्ष आशिष खातू, पाणीपुरवठा समिती सभापती निहार कोवळे, नगरसेविका राणी महाडिक, रुही खेडेकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बळीराम मोरे, माजी सभापती शौकत मुकादम, दिशा दाभोळकर आणि डॉ. रेहमत जबले आदी मान्यवर उपस्थित होते.













