Ratnagiri : शिक्षक भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, अन्यथा सीईओंच्या केबिनला टाळे ठोकण्याचा इशारा

चिपळूण : राज्य सरकारने शाळेतील रिक्त जागांवर तत्काळ भरती करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही रत्नागिरी जिल्हा परिषद ढीम्म आहे. इतर जिल्ह्यात भरती सुरू झाली असतानाही येथे झाली नाही. त्यामुळे तत्काळ भरती सुरू करून स्थानिकांना प्राधान्य द्यावे अन्यथा रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या सीईओंच्या केबिनला टाळे ठोकू, असा इशारा अखिल भारतीय मराठा महासंघाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी दिला आहे.

महाराष्ट्र सरकारने शाळेतील रिक्त असलेल्या जागांवर पदवीधर तसेच डीएड्, बीएड् बेरोजगार लोकांना तत्काळ नियुक्ती देऊन अध्यापन सुरू करावे, असे आदेश दिले. त्यानुसार बुलढाणा, सोलापूर तसेच अन्य जिल्ह्यात भरती प्रक्रिया सुरू झाली आहे; मात्र रत्नागिरी जिल्ह्यात भरती करताना सर्वप्रथम स्थानिकांना प्राधान्य मिळायला हवे. येथे शिक्षक, डीएड्, बीएड् बेरोजगार भरपूर आहेत. त्यांना संधी मिळालीच पाहिजे. त्या व्यतिरिक्त जर बाहेरचे उमेदवार भरले गेले तर हुसकावून लावल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा सावंत यांनी दिला आहे. जिल्हा परिषद सीईओंनी ही भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करावी अन्यथा सीईओंच्या केबिनलाच टाळे ठोकू, असा इशारा जिल्हाध्यक्ष संदीप सावंत, संगमेश्वर माजी सभापती दिलीप सावंत यांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:07 25-09-2024