चिपळूण : चिपळूणमध्ये मराठा भवन उभारण्यासाठी भरीव आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा चिपळूण तालुका, मराठा महाकुटुंब तसेच मराठा शिवजयंती महोत्सव समितीतर्फे चिपळूण दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले. या निवेदनावर ना. पवार यांनी मराठा भवनासाठी भरीव निधी दिला जाईल, अशी ग्वाही दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेनिमित्त चिपळूण दौऱ्यावर आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली सभा आटपून हॉटेल अतिथी येथे असता उद्योजक प्रकाश देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी ना. पवार यांना मराठा समाजाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
या समाज भवनासाठी सुमारे दहा कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. कोकणातील एक भव्य अशी मराठा समाजाची वास्तू उभी करण्याचे आमचे स्वप्न आहे. हे स्वप्न केवळ आपल्या सहकार्यातून पूर्णत्वास जाईल. याची आम्हाला पूर्ण खात्री आणि विश्वास आहे, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधी देण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी संतोष सावंतदेसाई, तानाजी इलके, प्रसाद शिर्के, सिद्धांत देशमुख, अभिनव देशमुख, शैलेश मोरे, संजय घाडगे आदी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:50 PM 25/Sep/2024