संगमेश्वर : बावनदी नवीन उड्डाणपूल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर बावनदी येथे नवीन उड्डाणपूल उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येथील उड्डाणपुलाचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे; मात्र पुलावरून वाहतूक सुरू होण्यास अजून चार महिन्यांचा कालावधी जाईल, अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून देण्यात आली.

रत्नागिरी जिल्ह्यात कशेडी बोगदा ते आरवलीपर्यंतच्या दोन्ही लेनवरून वाहतूक सुरू आहे. आरवलीपासून संगमेश्वरपर्यंत जवळपास एका लेनचे काम पूर्ण झाले आहे. त्यावरून वाहतूक सुरू आहे. सावर्डे, वहाळ फाटा, आरवलीपासून संगमेश्वरपर्यंतचे जोडरस्ते डांबरी केले जात आहेत. संगमेश्वर उक्षीपर्यंत एक लेन काही भाग सोडल्यास पूर्ण होत आली आहे. वांद्रीपासून निवळीपर्यंत आणि हातखंबा येथील काही ठिकाणी रस्त्याची अवस्था अजून बिकट आहे; मात्र बावनदीवरील उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

या पुलासाठी बावनदीत २०२१ मध्ये पिलर उभारण्यात आले होते; मात्र आरवली ते हातखंबादरम्यानचे कामच रखडले होते. त्यामुळे पुलाचे काम सुरू झाले नव्हते. त्यामुळे नदीत उभारलेले पिलर केवळ शोभेचे बाहुले म्हणून उभे होते. चार महिन्यांपूर्वी उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असून, ते युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत सत्तर टक्के काम पूर्ण झाले आहे. पुलाचे काम सुरू असताना
जुन्या पुलावरून नियमित वाहतूक सुरू आहे. त्यामुळे हे काम करताना मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीला कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण झाला नाही, कामाचा चालकांना त्रास झाला नाही. हे काम ईगल कंपनीकडून सुरू आहे. आवश्यक त्या ठिकाणी मातीचा भरावही केला जात आहे.

बावनदीवरील उड्डाणपुलासाठी लागणारे गर्डर तयार करण्यात आले आहेत. रेडिमेड गर्डर उड्डाणपुलावर बसवले जाणार आहेत. बहादूरशेख नाका येथे उड्डाणपूल बांधताना त्याचे गर्डर कोसळले. त्यामुळे मोठा अपघात झाला होता. ती घटना लक्षात घेऊन बावनदी येथील उड्डाणपुलाचे काम करताना सुरक्षेची सर्व जबाबदारी घेण्यात आली आहे. चार महिन्यांत पुलाचे काम शंभर टक्के पूर्ण होऊन या पुलावरून वाहतूक सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राजेंद्र कुलकर्णी, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग- रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:17 PM 26/Sep/2024